लग्न झाल्यापासून विभक्त; घटस्फोटाला त्वरित मंजुरी

लग्न झाल्यापासून विभक्त; घटस्फोटाला त्वरित मंजुरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरच्यांच्या परस्पर प्रेमविवाह केल्यानंतर एक दिवसही संसार न करता एक वर्ष वेगळे राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे मोठा कालावधी विभक्त राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. याचा आधार घेत कालावधी वगळून घटस्फोट मंजूर करण्याची मागणी वकिलांनी केली. त्यानुसार सुनावणीच्या दुसर्‍या तारखेला कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी हा निकाल दिला.

अनुराग आणि प्रेरणा (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही 28 वर्षांचे आहेत. दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. ओळखीतून प्रेमही झाले होते. त्यातून मे 2022 मध्ये दोघांनी घरच्यांच्या परस्पर नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. त्यानंतर ती तिच्या घरी, तर तो त्याच्या घरी राहत होता. दोघेही उच्चशिक्षित असून, दोघेही नोकरी करतात.

लग्नाच्या काही कालावधीनंतर दोघांच्या घरच्यांना लग्नाबाबत कळले होते. दरम्यान, वैचारिक मतभेद आणि स्वभावातील विभन्नतेमुळे त्यांच्यात वाद झाले. हा वाद कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीच्या वतीने अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे, अ‍ॅड. ज्ञानदा कदम यांनी काम पाहिले, तर पतीच्या वतीने अ‍ॅड. चेतना फटाले यांनी काम पाहिले.

परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास दोघेही तयार असल्याने आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.

– अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे (पत्नीच्या वकील)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news