गझलेच्या मूळ प्रवृत्तीशी इमान राखणे अत्यावश्यक : भूषण कटककर

गझलेच्या मूळ प्रवृत्तीशी इमान राखणे अत्यावश्यक : भूषण कटककर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठी गझल समृद्ध होत असून, गझलमध्ये मानवतावादी विचार प्रामुख्याने येण्याची गरज आहे. तेढ वाढवणारे विचार प्रस्तृत करणे हे साहित्यास हानिकारक आहे. दैवी प्रतिभेला न्याय द्यायचा असेल, तर गझलेच्या मूळ प्रवृत्तीशी इमान राखणे अत्यावश्यक आहे, असे मत गझलकार भूषण कटककर ऊर्फ बेफिकीर यांनी व्यक्त केले.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे यंदाचा गझलकार अनिल कांबळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गझलदीप पुरस्कार भूषण कटककर यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते. कवी विलास अत्रे, गझलकार राजेंद्र शहा, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आदी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, प्रत्येक लहान-मोठी साहित्य चळवळ ही साहित्य विश्वाला पोषक असते. या चळवळींचा आवाज छोटा असला, तरी त्या चळवळी साहित्याचा झरा अखंडितपणे प्रवाहित ठेवतात. सांस्कृतिक इतिहास हा राजकीय इतिहासाला प्रेरक आणि मार्गदर्शक असतो. त्यामुळे सांस्कृतिक संस्थांचे दस्ताऐवजीकरण आवश्यक आहे.

गझल हा साहित्य प्रकार तांत्रिक असल्याने त्याचे तंत्र आणि व्याकरण समजल्याशिवाय समृद्ध गझल अस्तित्वात येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. गझलकार अनिल कांबळे यांनी गझल संदर्भातील ध्येयवाद जपला, म्हणूनच त्यांच्याकडून दर्जेदार गझलांची निर्मिती झाली. यानिमित्ताने प्रमोद खराडे, वैभव कुलकर्णी, विशाल राजगुरू, डॉ. स्नेहल कुलकर्णी, मीना शिंदे, अभिजित काळे आणि राजेंद्र शहा यांचा गझलांचा कार्यक्रम झाला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news