काळजी घ्या, ‘आय फ्लू’चे रुग्ण वाढताहेत; पुण्यात हजारांहुन अधिक रुग्ण

काळजी घ्या, ‘आय फ्लू’चे रुग्ण वाढताहेत; पुण्यात हजारांहुन अधिक रुग्ण

पुणे : शहरातही गेल्या काही दिवसांमध्ये 'आय फ्लू' अर्थात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिकेकडून याबाबत सर्वेक्षण आणि उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात आतापर्यंत 1000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 194 रुग्ण बरे झाले आहेत. पावसाळ्यात कोणत्याही आजाराच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. हवेतील ओलाव्यामुळे विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. विषाणूंचा प्रसार झपाट्याने झाल्याने डोळ्यांची साथ आली असून, डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळे सुजणे अशी लक्षणे दिसत आहेत.

सुरुवातीला केवळ लहान मुलांमध्ये साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता प्रौढांमध्येही संसर्ग आढळून येत आहे. डोळ्यांच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शाळांमध्ये डोळे तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून सौम्य लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. मुलांमध्ये डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास दिसल्यास शाळेत पाठवू नये, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

शहरात किती आहेत रुग्ण

  • बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण : 788
  • सर्वेक्षणातून सापडलेले रुग्ण : 264
  • बरे झालेले रुग्ण : 194

काय काळजी घ्यावी?

  • डोळ्यांची स्वच्छता राखा.
  • डोळे आल्यास बाहेर जाताना चष्मा घाला. टॉवेल आणि कपडे कोणालाही वापरण्यास देऊ नका.
  • संसर्ग झाला असल्यास शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयातून सुटी घ्यावी.
  • संसर्ग झाल्यास डोळे दिवसातून दोनदा थंड पाण्याने धुवावेत.
  • नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच आय ड्रॉप तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच वापरावे.
  • स्टिरॉइड्स असलेली औषधे वापरू नयेत.

डेंग्यू, चिकुनगुनियाचा धोका!

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या विषाणुजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असली, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. डासोत्पत्ती ठिकाणे शोधून नष्ट करणे, कीटकनाशक फवारणी, अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळणार्‍या आस्थापनांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत.

गेल्या पाच वर्षांत शहरात डासांमुळे पसरणार्‍या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फि—जच्या मागील ट्रे, कुंड्या, रुग्णालये, बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळल्यास नोटिसा बजाविण्यात येत आहेत. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शहरात डेंग्यूचे 715 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 39 पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. 1159 आस्थापनांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, 1 लाख 56 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जुलैमध्ये चिकुनगुनियाचा 1 रुग्ण आढळून आला. आतापर्यंत एकाही रुग्णामध्ये मलेरियाचे निदान झालेले नाही.

डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते. या तपासणीमध्ये आतापर्यंत 1159 डास उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. यातील 656 नोटिसा जुलैमध्ये, तर 10 नोटिसा ऑगस्टच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये बजाविण्यात आल्या आहेत

– डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news