बडोदावालाने दिले बॉम्बनिर्मितीचे प्रशिक्षण; सासवडच्या जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी | पुढारी

बडोदावालाने दिले बॉम्बनिर्मितीचे प्रशिक्षण; सासवडच्या जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोथरूड पोलिसांनी पकडलेले दहशतवादी मोहम्मद खान, मोहम्मद साकी आणि ‘एनआयए’ने अटक केलेले दहशतवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘एनआयए’च्या (आर्थर रोड कारागृहातून) ताब्यातून दहशतवादी झुल्फिकार अली बडोदावाला याला अटक केली. त्यानेच दोघांना सासवड घाटाजवळील जंगलात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे आणि चाचण्या केल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, बडोदावाला हा दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍यांपैकी मुख्य संशयित आरोपी असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रतलाम येथील दहशतवादी अलसुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत; तर ‘एनआयए’ने अटक केलेले दहशतवादी महाराष्ट्र मोड्युलशी संबंधित आहेत.

मात्र, या सर्वांचे अंतिम लक्ष्य ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे काम करण्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य पातळीवर सर्व तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याची तपासात माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील आर्थर कारागृहातून त्याला मंगळवारी ताब्यात घेत अटक करण्यात आली.

कोथरूडमधून दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असताना मोहम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय 23) आणि मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (24, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली होती. दोघांना आश्रय देणार्‍या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (32, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली होती. ‘एटीएस’कडून करण्यात आलेल्या तपासात एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या अभियंता सीमाब नसरुद्दीन काझी (27, रा. कोंढवा, मूळ रा. पणदेरी, रत्नागिरी) याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती.

सर्वजण होते परस्परांच्या संपर्कात

2017 ते 2022 या कालावधीत बडोदावाला कोंढवा परिसरात राहण्यास होता. त्याच दरम्यान तो अटक करण्यात आलेल्या सर्वांच्या संपर्कात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या टेक्निकल डेटा विश्लेषणावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी बडोदावाला याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील यशपाल पुरोहित यांनी विरोध केला.

तरुणांना बॉम्बस्फोट करणे, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण

‘एनआयए’ने 3 जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद ऊर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे. ‘एनआयए’ने ‘इसिस’च्या महाराष्ट्र गटाचा (मोड्युल) डॉ. अदनान अली सरकार याला कोंढवा परिसरातून अटक केली होती.

तरुणांची माथी भडकावून त्यांना ‘इसिस’च्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. देशाच्या एकात्मतेला, सुरक्षेला, अखंडतेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याचा त्यांचा कट होता. तसेच महाराष्ट्रातील स्लिपर सेल वाढविण्याचेदेखील त्यांचे काम सुरू होते. बडोदावाला हा तरुण शस्त्र बनविण्याचे तसेच इम्प्रोव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) तसेच हातबॉम्ब बनविण्याचे तसेच पिस्तूल बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानेच कोथरूडहून पकडलेल्या दोघांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाचा महिनाभरात निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

अहमदनगर : कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मंजुरीसाठी युवकाचं उद्योगमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र

संभाजी भिडेंच्या चिपळूण सभेला परवानगी नाकारली

Back to top button