लाईक अन सबस्क्राईब पडतंय महागात; टास्कच्या बहाण्याने फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या  

लाईक अन सबस्क्राईब पडतंय महागात; टास्कच्या बहाण्याने फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या  
Published on
Updated on
पिंपरी(पुणे) : 'आमच्या यू-ट्यूब चॅनेलला लाईक अन् सबस्क्राइब केल्यास तुम्हांला घरबसल्या पैसे मिळतील', अशा प्रकारचे वेगवेगळे टास्क देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरट्यांकडून सुरुवातीला तुमच्या बँक खात्यात किरकोळ पैसे टाकून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर मात्र लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचे काही प्रकरणांमधून समोर येत आहे. त्यामुळे मोबाईलधारकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

बँक खातेच रिकामे

ऑनलाईन टास्कमध्ये लाईक, सबस्क्राईबचा हा नवा पॅटर्न सध्या जोमात सुरू आहे. गुंतवणुकीवर जास्तीची रक्कम मिळण्याच्या आशेने नेटकरी याला मोठ्या संख्येत बळी पडत आहेत. पोलिसांच्या आवाहनांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अनेकांचे बँक खाते रिकामे झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

…अशी आहे मोडस ऑपरेंडी

सायबर चोरटे व्हॉट्स अ‍ॅपवर यू-ट्यूब चॅनेलची लिंक शेअर करतात. लिंकवर क्लिक करून चॅनेलला लाईक अन् सबस्क्राईब करण्यास सांगितले जाते. या बदल्यात तुम्हाला 3 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कमावता येतील, असे आमिष दाखवले जाते. यामध्ये प्रामुख्याने आयटी क्षेत्रात काम करीत असलेल्यांना टार्गेट केले जाते. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही पैसेदेखील जमा केले जातात. त्यानंतर मोठ्या रकमेचे आमिष दाखवून जास्त पैसे गुंतवण्यास भाग पाडतात. एकदा का मोठी रक्कम अडकवली की, सायबर चोरटे संपर्क बंद करतात.

…तर व्हा सावध

  • टेलिग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून कमीत कमी गुंतवणुकीवर जास्त परताव्याची ऑफर किंवा आश्वासने दिले जात असतील.
  • पैसे कमावण्यासाठी तुम्ही आधी पैसे भरा असे सांगत असेल.
  • नुसते क्लिक, शेयर लाईक करून पैसे कमवा, असे सांगितले जाते.
  • टेलिग्राम समुहामध्ये सामील होण्यासाठी सांगून पैशाचे आमिष दाखवले जात असेल.
  • तुम्हाला अनोळखी वेबसाईटवर खाते सुरू करण्यास सांगत असल्यास सावध व्हा.
  • पैसे काढण्यासाठी नवीन टास्क पूर्ण करण्यास सूचना दिल्या जात असतील.
  • पैसे काढण्यासाठी तुम्ही आधी पैसे भरा, असे सांगत असतील.
  • तुम्ही जलद कृती करा किंवा त्वरित पैसे द्या, असा आग्रह करणारे संदेश येत असतील.
माझ्या मोबाईल क्रमांकावर लिंक आणि मेसेज आला. लिंकवर क्लिक करून आमच्या यू-ट्यूब चॅनेलला लाईक अन सबस्काइक करा, असे यामध्ये नमूद करण्यात आले होते. पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, मी क्लिक केले असता माझी फसवणूक झाली.
– पीडित तरुणी, निगडी.  
टास्कच्या बहाण्याने फसवणुकींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून सोशल मीडियावर आलेल्या मेसेजला बळी पडू नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करणे धोकादायक ठरू शकते. काहीतरी बहाणा किंवा आमिष दाखवून सायबर चोरटे आपली गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. फसवणूक टाळायची असल्यास पोलिसांच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
– डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर सेल.
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news