पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पात साडेसहा हजार घरे

पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पात साडेसहा हजार घरे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने भोसरी- पेठ क्र. 12 येथील दुसर्‍या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार (दि. 1) ऑनलाईन भूमिपूजन करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडवर हा कार्यक्रम होईल. या गृहप्रकल्पात 6 हजार 452 घरे साकारणार आहेत.

पीएमआरडीएकडून 11.63 हेक्टर क्षेत्रावर गृहप्रकल्प 3, 4 व 5 मध्ये आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन गटासाठी (एलआयजी) एकूण 6 हजार 452 सदनिकांचा गृहप्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकासाठी 1102 कोटी 92 लाख तसेच निविदा रक्कम 730 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता प्राप्त आहे. त्यासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. त्यातून 6 हजार 452 परवडणारी घरे उपलब्ध होतील, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

3 हजार 200 लाभार्थ्यांना दिला सदनिकांचा ताबा

पीएमआरडीएकडून भोसरी येथे पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजनेत गृहप्रकल्प 1 व 2 मध्ये आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन गटांसाठी (एलआयजी) एकूण 4 हजार 883 सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. त्यामधील 3 हजार 200 लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news