

जोहान्सबर्ग : संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेत मोठे सुळे असलेल्या मार्जारकुळातील दोन प्राण्यांचे जीवाश्म शोधून काढले आहेत. हे सध्याच्या बिबट्यांसारखे दिसणारे प्राणी होते जे 50 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या भूमीवर वावरत होते. त्यांना तोंडाबाहेर आलेले एखाद्या चाकूसारखे दोन सुळे होते.
लुप्त झालेल्या या प्रजातीच्या अभ्यासावरून अनेक गोष्टींवरील रहस्याचा पडदा बाजूला जाऊ शकतो. त्या काळात पर्यावरणातही कोणते बदल झाले हे समजून घेता येऊ शकेल. मानवाचे पूर्वज दोन पायांवरच का चालू लागले हे जाणून घेण्यासही मदत होईल. या दोन नव्या प्रजातींना अनुक्रमे 'डायनोफेलिस वेर्डेलिनी' आणि 'लोकोट्यूंजैलुरस चिमसामी' अशी नावे देण्यात आली आहेत.
अन्य काही ज्ञात प्रजातीच्या प्राण्यांच्या हाडांसमवेतच या दोन प्रजातींच्या प्राण्यांचे जीवाश्म सापडले. दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील लँगेबानवेग या शहराजवळ हे जीवाश्म शोधण्यात आले. तिथे 'अडीलोस्मिलस कबीर' व 'योशी ओबस्करा' या प्रजातीच्या प्राण्यांचेही अवशेष सापडले.
मांजरांसारख्या शिकारी प्राण्यांच्या लुप्त झालेल्या समूहातील या चारही प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांश प्रजातींमध्ये असे मोठे सुळे होते. सध्याच्या काळातील वाघ, सिंह, बिबट्या यांच्यासारख्या मार्जारकुळातील मोठ्या प्राण्यांसारखेच हे शिकारी प्राणी होते. 'आयसायन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.