

वाडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना सर्वसामान्यांच्या हितासाठी केली खरी; पण हीच योजना काही गावांत वाहनचालकांना डोकेदुखी झाली आहे. योजनेचे संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी केलेले खोदकाम तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनांना अपघात घडू लागले आहेत. रविवारी (दि. 23) सकाळी राजगुरुनगर-चिखलगाव एसटी बसला आंबेकरवाडी (ता. खेड) जलजीवन योजनेच्या खचलेल्या चारीमुळे अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही.
अनेक गावांत राबविण्यात येणार्या जलजीवन योजनांची कामे ही संबंधित अधिकारी बसल्या जागेवरून करत आहेत. ठेकेदाराच्या जीवावर काम सोडून देत आहेत. ठेकेदारदेखील मनमानी पद्धतीने बोगस काम करत आहेत. चांगले रस्ते वाट्टेल तेथे खोदून चार्या बनविल्या जात आहेत. त्यात पाइप गाडून ते बुजवले जात आहेत. मात्र, चारी बुजविताना केवळ माती, मुरूम टाकला जात आहे, त्या चारी मजबूतपणे बुजवल्या जात नाहीत. कित्येक गावांमध्ये अगदी राज्य मार्गाच्या साइडपट्ट्यादेखील खोदून ठेवल्या आहेत.
मात्र, त्याचे सोयरसुतक ना सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे, ना जलजीवनच्या अधिकार्यांना, असे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या चार्या खचू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी चार्यांमध्ये पाणी साचत आहे. त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे वाहने चारीत फसणे, चारीमुळे वाहन पलटी होणे आदी घटना वाढू लागल्या आहेत. अशाच निकृष्ट कामामुळे आंबेकरवाडीत रविवारी राजगुरुनगर-चिखलगाव एसटीला अपघात झाला.
समोरून येणार्या वाहनास साइड देताना बस रस्त्यालगतच्या खोदलेल्या मात्र व्यवस्थित न बुजलेल्या चारीत रुतून वाहकाच्या बाजूने झुकली. सुदैवाने ही बस पलटी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बसवर नियंत्रण मिळवले. बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. याबाबत जलजीवनचे अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल क्रमांक बंद लागला.
हेही वाचा