स्वारगेट गोळीबार प्रकरण : नोकराने टिप दिली अन् व्यापार्‍याला लुटले; मुख्य सूत्रधारासह तिघांना ठोकल्या बेड्या

स्वारगेट गोळीबार प्रकरण : नोकराने टिप दिली अन् व्यापार्‍याला लुटले; मुख्य सूत्रधारासह तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट परिसरात तंबाखू व्यापार्‍यावर गोळीबार करून त्याला लुटणार्‍या मुख्य सूत्रधारासह तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कर्नाटकातील बंगळुरू शहरातून बेड्या ठोकल्या. व्यापार्‍याकडे पूर्वी काम करणार्‍या एका नोकराने टिप दिल्यानंतर तिघांनी एक महिन्यात योजना तयार करून व्यापार्‍याला लुटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अभय कुमार सुभोद कुमार सिंग (वय 23), नितीश कुमार रमाकात सिंग (वय 22), मोहम्मद बिलाल तसुद सुहेन शेख (वय 29,रा. तिघे आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे, मूळ बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, यापूर्वी पर्वती पोलिसांनी सूरज मयूरदास वाघमोडे याला अटक केली आहे. आरोपींकडून दोन पिस्तुले , 31 जिवंत काडतुसे आणि पळविलेली 3 लाख 52 हजार 500 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

19 जुलै रोजी लतेश हसमुखलाल सुरतवाला (51, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांच्यावर स्वारगेट भागात गोळीबार करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून याचा समांतर तपास सुरू होता, गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना माहिती मिळाली होती की, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा बंगळुरू येथे पळून गेला आहे. त्यानंतर दोन टिम तयार करून त्या बंगळुरु येथे पाठवण्यात आल्या होत्या. तेथून अभय आणि नितीश या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघे रेल्वेने बंगळुरू येथे पळून गेले होते.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे पोलिस निरीक्षक नंदनकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस उप निरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार संजय जाधव, अमोल सरडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवासे, रामदेव रेणुसे, नागनाथ राख, उत्तम तारु यांच्या पथकाने केली.

अभय मास्टर माइंड; नितीशने झाडल्या गोळ्या

व्यापार्‍याला लुटणार्‍या टोळीतील अभय हा मास्टर माइंड असून, नितीश याने व्यापार्‍यावर गोळ्या झाडल्या. सुरतवाला यांच्याकडे पूर्वी काम करणारा एक नोकर होता. तो सध्या मार्केट यार्ड परिसरात हमालीचे काम करतो. बोलता बोलता त्याने सुरतवाला याची माहिती या आरोपींना सांगितली होती. त्यानुसार त्यांनी लुटीची योजना आखली. त्यासाठी बिहार येथून दोन गावठी पिस्तुले आणली. तर, सूरज वाघमोडे याची दुचाकी वापरण्यात आली. जेव्हा व्यापार्‍यावर गोळीबार करण्यात आला त्या वेळी वाघमोडे हा दुचाकी चालवत होता. तर, अभय आणि नितीश पाठीमागे बसले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news