‘ईपीएफओ’वर मिळणार 8.15 टक्के व्याज | पुढारी

‘ईपीएफओ’वर मिळणार 8.15 टक्के व्याज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निधी योजनेनुसार जमा करण्यात आलेल्या रकमेवर 8.15 टक्के व्याज दर देण्याची घोषणा केली आहे. ‘ईपीएफओ’ने 28 मार्च 2023 रोजी 2022-23 करिता हा व्याज दर देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सहा कोटींहून अधिक सदस्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी हा व्याज दर 8.10 टक्के होता.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, ‘ईपीएफओ’ने विभागीय कार्यालयांना 2022-23 आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याज दर सदस्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले. मार्च 2022 रोजी 2021-22 करिता ‘ईपीएफओ’वरील व्याज दरात कपात करून तो 8.10 टक्के करण्यात आला होता. 1977-78 मधील 8 टक्क्यांच्या खालोखाल हे दर सर्वात कमी होते. गेल्या चार दशकांमध्ये हा व्याज दर सर्वात कमी म्हणजे नीचांकी होता. 2018-19 या आर्थिक वर्षात हा व्याज दर 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 मध्ये 8.8 टक्के व्याज दर होता.

मेमध्ये 8.83 लाख नवे सदस्य

कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात 3 हजार 673 आस्थापनांनी त्यांच्याकडील कर्मचार्‍यांना ‘ईपीएफओ’च्या कक्षेत आणले. मे महिन्यात ‘ईपीएफओ’सोबत 8.83 लाख नवीन सदस्य जोडले गेले. गेल्या सहा महिन्यांतील ही विक्रमी संख्या आहे. नव्या सदस्यांमध्ये 56.42 टक्के सदस्य 18 ते 25 वयोगटातील आहेत, हे विशेष होय.

Back to top button