इथेनॉल पुरवठ्यातून 4 हजार 700 कोटी प्राप्त | पुढारी

इथेनॉल पुरवठ्यातून 4 हजार 700 कोटी प्राप्त

किशोर बरकाले

पुणे : राज्यात 2022-23 च्या हंगामात एकूण 82 इथेनॉल प्रकल्पांतून ऑईल कंपन्यांना 76 कोटी 54 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करून त्यातून सुमारे 4 हजार 700 कोटी रुपये इथेनॉल प्रकल्पांना मिळाले. त्यामुळे साखर कारखान्यांचा कल भविष्यातही इथेनॉल उत्पादनाकडे वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्टातून ऑईल कंपन्यांच्या सुमारे 135 कोटी लिटर इथेनॉलपुरवठ्याच्या निविदा कारखान्यांनी भरल्या आहेत. त्यातून या प्रकल्पांना सुमारे 8 हजार 500 कोटी रुपये मिळतील.

राज्यातील 122 इथेनॉल प्रकल्पांची इथेनॉल उत्पादनाची क्षमता 226 कोटी लिटर इतकी आहे. मात्र, पूर्ण क्षमतेने अद्याप सर्व इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे अधिक उत्पादन आणि जादा पुरवठ्याच्या निविदा भरण्यास कारखान्यांना मर्यादा येतात. त्यामध्ये मळी, ज्यूस, सिरप या कच्च्या मालाचा पुरवठा तुलनेने कमी पडतो.

साखर आयुक्तालयातून प्राप्त माहितीनुसार, 34 सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉलचा 24.62 कोटी लिटर, 39 खासगी कारखान्यांचा इथेनॉलचा 47.59 कोटी लिटर, स्वतंत्र प्रकल्प असलेल्या (स्टँड अलोन डिस्टिलरी) 9 प्रकल्पांतून मिळून 4.43 कोटी लिटर, असा एकूण 76.54 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा जून 2023 अखेर ऑईल कंपन्यांना झाला आहे. उर्वरित इथेनॉलपुरवठा निविदांनुसार होताच प्रकल्पधारकांना रक्कम 21 दिवसांत मिळते. सी हेवीला 49.41 रुपये, बी हेवीला 60.73 रुपये, तर ज्यूसपासून इथेनॉल बनविण्यासाठी प्रतिलिटरला 65.61 रुपये असा दर मिळत आहे.

महाराष्ट्रात 135 कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअन्वये पुरवठा वेळेत करण्यासाठी सहकारी, खासगी प्रकल्पाधारकांकडे पाठपुरावा करीत आहोत. ऑईल डेपोमध्ये इथेनॉलचा टँकर गेल्यावर तो वेळेवर खाली न होणे ही मोठी अडचण यंदाही भेडसावत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून साखर कारखान्यांनी तयार इथेनॉल काही काळ साठविण्यासाठी टँक बांधण्यास पुढाकार घ्यावा.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,
साखर आयुक्त

हेही वाचा

पाऊस बनला खलनायक

मणिपूरमध्ये शाळा जाळली; 1 ठार

अभियांत्रिकी, विधी, एमबीएलाच डिमांड; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

Back to top button