पिंपरी : जिल्हा रुग्णालयात फायर ऑडिटचा नाही पत्ता!

पिंपरी : जिल्हा रुग्णालयात फायर ऑडिटचा नाही पत्ता!

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : मागील काही वर्षांत राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिकेची 8 रुग्णालये व 8 क्षेत्रीय कार्यालये यांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश शुक्रवारी (दि. 21) महापालिका प्रशासनाने प्रभारी उप अग्निशमन अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गतवर्षी फायर ऑडिट केले होते. यंदा हे ऑडिट अद्याप झालेले नाही.

महापालिका आणि सरकारी रुग्णालयांकडून दरवर्षी फायर ऑडिट करण्यात येते. मात्र, दरवर्षी निश्चित वेळेत फायर ऑडिट करून घेण्याकडे रुग्णालयांचे दुर्लक्ष होते. महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास त्वरित आगीवर नियंत्रणासाठी महापालिका इमारतींमध्ये अग्नीसुरक्षा ठेवण्यासाठी प्राथमिक स्वरुपातील अग्निशामक साधने बसविली आहेत. तसेच, इमारतीत मोठ्या स्वरुपातील स्थायी अग्निशमन यंत्रणा, फायर पम्प, डाऊन कोमर, स्प्रिंकलर, डिटेक्शन, फायर अलार्म आदी सुरक्षाविषयक साधने महापालिका विद्युत विभागाकडून आवश्यकतेनुसार बसविली आहेत.

रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालयांचे फायर ऑडिट होणार

महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालये आणि 8 रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश शुक्रवारी (दि. 21) महापालिका सहाय्यक आयुक्त (अग्निशामक) यांच्यामार्फत प्रभारी उप अग्निशमन अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या मिळकतींचे अग्नी परीक्षण करून त्यामध्ये आढळणार्‍या विविध त्रुटींची पूर्तता होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी 8 अधिकार्‍यांकडे जबाबदारी सुपूर्द केली आहे. त्यांनी क्षेत्रीय कार्यालये आणि महापालिका रुग्णालयांचे वार्षिक अग्नी परीक्षण, मासिक प्रशिक्षण आणि सहामाही मॉकड्रील घेऊन त्याचा अहवाल अग्निशामक कार्यालयाकडे तातडीने सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका रुग्णालयांचे ऑडिट झाल्याचा दावा

महापालिकेच्या आठही रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले असल्याचा दावा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना केला. अग्निशमन विभागाने केलेल्या सूचनांनुसार रुग्णालयांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

चालू वर्षाचे फायर ऑडिट बाकी

सांगवीतील पुणे जिल्हा रुग्णालयाची क्षमता सुमारे 300 खाटांची आहे. या रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यास अनुसरून येथील अग्निशमन यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. गतवर्षी रुग्णालयाच्या वतीने फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र, यंदा अद्याप फायर ऑडिट होणे बाकी आहे.

फायर ऑडिटकडे दुर्लक्ष नको

राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये गेल्या काही वर्षांत आगीच्या घटना घडल्या आहेत. तरीही फायर सेफ्टीबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये आग लागून विविध दुर्घटना राज्यातील रुग्णालयांत घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन सांगवीतील जिल्हा रुग्णालय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट करून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयात गतवर्षी फायर ऑडिट झाले होते. ऑडिटनुसार रुग्णालयामध्ये वॉटर टँक, स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, हायड्रंट आदी यंत्रणा बसविली आहे. यंदा फायर ऑडिट अद्याप झालेले नाही. मात्र, ते लवकरात लवकर केले जाणार आहे. रुग्णालयात आपत्कालीन समिती अस्तित्त्वात आहे. स्प्रिंकलर चाचणी झाली आहे.

– डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय.

महापालिकेची 8 रुग्णालये आणि 8 क्षेत्रीय कार्यालयांचे फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना नव्याने प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

– ऋषिकांत चिपाडे,
उप-अग्निशमन अधिकारी,
अग्निशमन विभाग.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news