साहित्‍य : अस्तित्वाला शब्दांत पकडू पाहणारा लेखक

साहित्‍य : अस्तित्वाला शब्दांत पकडू पाहणारा लेखक
Published on
Updated on

वैयक्तिक आयुष्यातही कुंदेरा एक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, माणसाला स्वतःच शोध घेण्याचा अधिकार आहे असा मानणारे लेखक राहिले. या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या नादात त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले. सरकारशी, व्यवस्थेशी पंगे घेतले. पण आपल्या लेखणीतून सत्याशी भिडण्याची ताकद असल्याने त्यांना शेवटी जगाला स्वीकारावेच लागलं.

जगद्विख्यात कादंबरीकार मिलान कुंदेरा यांचे 94 व्या वर्षी निधन झाले. सत्तेविरोधात विधान केल्याने झेकोस्लोव्हाकियामधून हकालपट्टी झालेले कुंदेरा फ्रान्समध्ये आले. ते ज्या पॅरिसमध्ये आले, ते पॅरिस स्वातंत्र्याचं, समतेचं शहर होतं. अजूनही आहे, असं काहींच म्हणणं असेलही. पण, पॅरिसमध्ये झालेल्या दंगलीनंतर तसं वाटत नाही. कुंदेरा जसे बाहेरून आले, तशाच बाहेरच्यांविरोधात जळणारं हे पॅरिस, कुंदेरांना पाहवलं नाही का?

मिलान कुंदेरा गेले. त्यानंतर काही वेळातच मराठीतला संवेदनशील कवी असलेल्या किशोर कदम म्हणजेच सौमित्रने एक फेसबुक पोस्ट लिहिलीय. ही पोस्ट म्हणजे खरं तर मुक्तछंदातील कविताच आहे. बरीच मोठी पोस्ट आहे. पण त्यातील काही ओळीत सौमित्र म्हणतो, 'मला कळत नाही, प्रत्येक पळून जाणार्‍या कलावंताला पॅरिसच का आठवतं? पण जगातले खूप खूप श्रेष्ठ कलावंत पॅरिसमध्येच घडले
हेही तितकंच खरं. पण परवा अख्खं पॅरिस जळत होतं तेव्हा तुला काय वाटलं? की त्याचाच धसका घेतलास तू?'

सौमित्रमधल्या एका संवेदनशील माणसाला जाणवलेला हा प्रश्न वैश्विक आहे. देश, भाषा, रंग वगैरे वगैरेच्या झूठ सीमारेषांना कुठच्या कुठे भिरकावून देणारा हा प्रश्न आहे. आज सगळं जग आमचं आणि तुमचं करण्याच्या नादात गुंतलेलं असताना, माणसातील जनावराच्या खुणा पुन्हा उफाळून वर येत असताना, कुंदेरांचं जाणं आणि त्यांना असा प्रश्न विचारणं, हे सगळंच खूप खोल खोल अर्थपूर्ण आहे. कुंदेरा त्यांच्या लेखनातून माणसाच्या माणूसपणातून मोकळं होण्याचा असाच काहीसा अर्थ शोधत होते का?

आजघडीच्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय लेखकांमध्ये ज्यांचं नाव पहिल्या काही नावांमध्ये घेतलं जातं असं नाव म्हणजे मिलान कुंदेरा. कुंदेरांना आयुष्यानं तब्बल 94 वर्षं दिली. एवढ्या मोठ्या कालावधीत त्यांनी खूप काही पाहिलं. दुसरं महायुद्ध झालं तेव्हा कुंदेरा दहा वर्षाचे होते. या महायुद्धात झालेला भीषण नरसंहार, जगभरातील राज्यकर्त्यांचे हिंस्त्र चेहरे, सत्तेचा किळसवाणा खेळ आणि या सगळ्याला उत्तर शोधणारे तत्त्वज्ञ, कलाकार, साहित्यिक आणि काही राजकारणीही.

हे सगळं पाहात कुंदेरा मोठे होत गेले. कुंदेरा आपल्या साहित्यातून जे मांडतात ते थेट काळजाला भिडतं. कारण ते माणसाच्या माणूस असण्याचा शोध घेत होते. माणूसपणाच्या मुखवट्यामागे लपलेल्या जनावराला उघड करत होते. म्हणूनच ते त्यांच्याच देशातील सत्ताधीशांना नकोसा होतेे.

स्वतःला साम्यवादी म्हणवणार्‍या सत्ताधीशांनी झेकोस्लोव्हाकियात चालविलेल्या दमनशाहीविरोधात कुंदेरा यांनी लेखन केलं. ज्या कम्युनिस्ट पक्षाचे ते सदस्य होते, त्यांनाच ते परके वाटू लागले. कारण कुंदेरा त्यांचे दोष दाखवत होते. हकालपट्टी झालेल्या कुंदेरांंनी अखेर 1975 साली शिक्षण सोडले, देश सोडला आणि मुक्त स्वातंत्र्याचं कलेचं शहर असलेल्या पॅरिसमध्ये ते आले.

प्रख्यात संगीतकार वडिलांचा मुलगा असलेल्या मिलान कुंदेरांनी सुरुवात संगीत शिकण्यापासूनच केली होती. पण संगीताच्या सूरापेक्षा शब्दांच्या खेळात ते जास्त रमले. सुरुवातीला प्रेम कविता, एकपात्री नाटिका, कम्युनिस्ट साहित्य असलं लेखन करणार्‍या कुंदेरांची उपरोधिक भाषा लोकांना जास्त आवडू लागली होती. त्यांच्या या भाषेत ते अनेकदा सत्ताधीशांना चिमटेही काढत.

'द जोक' ही कुंदेरांची पहिली गाजलेली कादंबरी. 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर झेकोस्लोव्हाकियामध्येच बंदी घालण्यात आली होती. सत्तेच्या कठोर चौकटीमध्ये घट्ट बसवलेल्या कम्युनिस्टांना हे असलं काही खपणारं नव्हतं. 'द जोक'मध्ये एक नायक एका पोरीला पटवण्यासाठी जे काही खटाटोप करतो, त्यात तिला इम्प्रेस करण्यासाठी सरकारविरोधात बोलतो.

विनोदी पद्धतीच्या या वाक्यांमधून कुंदेरांनी जे काही मांडले ते सरकारला झोंबले. त्यावरून पुस्तकावर बंदी आली. कुंदेरांच्या विरोधातही वातावरण तयार झालं. कुंदेरा तिथल्या भाषेत लिहीत होते. सत्तेच्या विरोधात लिहीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना ते आवडत होतं. त्यामुळे शेवटी त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो आणि अखेर कुंदेरांना देश सोडावा लागला. पण कुंदेरासाठी ते नवं स्वातंत्र्य
होतं. 'लाइफ इज एल्सव्हेअर' ही त्यांची कादंबरीही अशीच गाजली. ही देखील त्यांनी फ्रान्समध्ये येण्याआधी लिहिली होती. या सगळ्या कादंबर्‍यांमधून कुंदेरांनी सामान्य माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांमधून त्याची होणारी घालमेल दाखवली. व्यवस्थेकडून त्याचं होणारं शोषण दाखवलं. या सगळ्यामधून सरकारविरोधात चीड यावी, अशी परिस्थिती उभी केली.
त्यांच्या 'द अनबेअरेबल लाईटनेस ऑफ बिइंग'ने जागतिक अभिजात साहित्यामध्ये स्थान मिळविलं. ते स्टार झाले या कादंबरीमुळेच. 1984 मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी तत्त्वज्ञानाच्या अनंत अंतराळात घेऊन जाते. एक डॉक्टर, त्याची पत्नी, त्याच्यातील नातेसंबंध आणि त्याच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या राजकीय हालचाली मांडत कुंदेरांनी अस्तित्वाचे प्रश्न उभे केले.
'एखाद्या व्यक्तीला काय हवे आहे हे कळत नाही. कारण त्याचे फक्त एकच जीवन आहे आणि तो त्याची मागील जीवनाशी तुलना करू शकत नाही किंवा नंतरच्या जीवनात ते दुरुस्त करू शकत नाही…' अशा आशयाचे या कादंबरीतील विचार नंतर लोकप्रिय झाले. 'इम्मॉर्टेलिटी', 'स्लोनेस', 'आयडेंटिटी' आणि 'द फेस्टिव्हल ऑफ इनसिग्निफिकन्स' या त्यांच्या साहित्यकृती वाचकांना भावल्या आणि अनेक भाषांत त्यांचे अनुवादही झाले.
कुंदेरांच्या आयुष्याची जडणघडण कम्युनिस्ट विचारातून झाली असली तरी, त्यांनी कायमच व्यवस्थेला प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांच्या लेखनात माणसाविषयी असलेली जिज्ञासा दिसते. पण तिला चौकटीत बसवण्याचा अट्टहास त्यात नाही. त्यामुळेच कुंदेरा कम्युनिझम, राजकारण याच्या पलीकडे जाऊन माणसाच्या अस्तित्वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतात. नित्शेच्या तत्त्वज्ञानाशी जवळीक सांगत ते माणसाला त्याच्या स्वरूपाबद्दल प्रामाणिक राहण्याचा आग्रह धरतात.
वैयक्तिक आयुष्यातही कुंदेरा एक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, माणसाला स्वतःच शोध घेण्याचा अधिकार आहे, असा मानणारे लेखक राहिले. या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या नादात त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले. सरकारशी, व्यवस्थेशी पंगे घेतले. पण आपल्या लेखणीतून सत्याशी भिडण्याची ताकद असल्याने त्यांना शेवटी जगाला स्वीकारावेच लागलं.
कुंदेरांच्या लेखनावर आधारित काही सिनेमेही आले. त्यातील जोक, नो बडी विल लाफ यासोबत त्यांच्या गाजलेल्या 'द अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग' या वरदेखील 1988 मध्ये सिनेमा आला. फिलिफ कॉफमनने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमासाठी जीन-क्लॉड कॅरीरे आणि कॉफमॅन यांना पटकथेच्या ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.
जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणार्‍या पॅरिसमध्ये कुंदेरांच्या प्रतिभेला बहर आला. त्यांनी त्या मोकळ्या हवेत जे श्वास घेतले, त्यातून त्यांच्या लेखणीला आणखीच धार आली. एखाद्या पिंजर्‍यात अडकेल्या पक्ष्याला मोकळं आकाश मिळावं तसं त्यांचं झालं. त्यांच्या या यशानंतर आणि जागतिक स्थितीही बदलल्यानंतर झेक सरकारनं त्यांना पुन्हा नागरिकत्व प्रदान केलं. पण तोपर्यंत कुंदेरा देशकालाच्या सीमा ओलांडून गेले होते.
माणूस जन्माला येतो ते त्याच्या हातात नसतं, त्याच्यापुढे काय वाढून ठेवलंय हेही त्याच्या हातात नसतं. पण जे काही समोर आहे त्याचं काय करायचं याचा त्यानं सतत शोध घेत राहायला हवं. फ्रान्सनं आणि एकंदरीतच आधुनिकतेनं हे जगाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, हे माणसाला मिळालेलं सामर्थ्य
आहे. त्यावर पुन्हा पुन्हा संकुचिततावादी विचारांचे, चौकटी लादणार्‍या प्रवृत्तीचे हल्ले होत राहणार
आहेत. त्याला भिडण्यासाठी कुंदेरांना समजून
घेत राहायला हवं
फ्रान्समधील निवडणुका आणि त्याच्या भोवतीचं राजकारण पाहून एकदा कुंदेरा म्हणाले होते की, "जरी राजकारण मला तमाशा म्हणून बरा वाटला तरी मला राजकीय जीवनात भाग घेणे आवडत नाही." आयुष्यभर राजकारण पाहिलेल्या कुंदेरांचं हे वाटणं समजून घ्यायला हवं. बदलत जात असलेलं पॅरिस त्यांना विषण्ण करत होतं.
सत्ता आणि माणूस यांच्यातील संघर्ष हे त्रिकालबाधित आहे. आज जे काही पॅरिसमध्ये होतंय, ते त्याच सत्तेच्या उन्मादातून होणारी प्रतिक्रिया आहे. स्वातंत्र्याचा उद्घोष करणार्‍या पॅरिसमध्ये हे घडणं कुंदेरांना कधीच आवडलं नसेल. कुंदेरांची अनेक वाक्यं ही सुविचारासारखी आहेत. असंच आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, "आपण इतिहास विसरतो. माणसाचा सत्तेविरोधातील संघर्ष हा विस्मृतीविरोधात स्मृतींचा असलेला संघर्ष आहे." कुंदेरा यांच्या स्मृती जिवंत ठेवायला हव्यात. कारण कुंदेरा यांनी आपल्या शब्दांत जपलेलं माणसाच्या स्वातंत्र्याचं पॅरिस जळून जाता कामा नये.

नीलेश बने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news