श्रीक्षेत्र कोल्हार येथे आजपासून भागवत कथा

श्रीक्षेत्र कोल्हार येथे आजपासून भागवत कथा

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे आज (रविवार दि. 23) पासून येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या प्रांगणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत आहे. श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सरलाचे पिठाधीश गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून कथा श्रवणाचा लाभ भाविकांना होणार आहे.
रविवार (दि. 30 जुलै) पर्यंत संपन्न होत असलेल्या या सोहळ्यात पहाटे 4 ते 5 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 विष्णु सहस्रनाम, सकाळी 7 ते दु. 13 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व सायं. 7 ते रात्री 10 यावेळेत श्रीमद् भागवत कथा असे दैनंदिन होणार आहेत.

या सप्ताह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामदैवत भगवती माता मंदिर प्रांगणात सप्ताह सोहळ्यासाठी 200 बाय 90 चा वॉटरप्रूफ डोम मंडप उभारला आहे. 40 बाय 60 चे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. मंडपात दोन एलसीडी स्क्रीन लावण्यात आले आहे. गावातील प्रवेशद्वारावर कमाणी उभारण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात दुतर्फा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.

अशा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार्‍या या भागवत कथा सप्ताहाची सांगता रविवारी 30 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने वाटपाने होणार आहे. या सप्ताह सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त व कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news