वेल्ह्यासह पश्चिम हवेलीत कडकडीत उन्हाळा; भात रोपांच्या लागवडी ठप्प

वेल्ह्यासह पश्चिम हवेलीत कडकडीत उन्हाळा; भात रोपांच्या लागवडी ठप्प
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

वेल्हे(पुणे) : जिल्ह्यात अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेल्हे तालुक्यासह पश्चिम हवेलीत पाऊस गायब होऊन कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे. सन 1972 नंतर प्रथमच गेल्या 50 वर्षांत वेल्हे तसेच हवेली तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कोरड्या दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी राजगड-तोरणा खोर्‍यासह पानशेत, सिंहगड भागात भात रोपांच्या लागवडी ठप्प पडल्या आहेत. डोणजे, खानापूर, मोगरवाडी, आर्वीसह ठिकठिकाणी भात रोपांसह खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. भात पिकांचे आगार असलेल्या जोरदार पावसाच्या भागातच पावसाने पाठ फिरवल्याने कृषी विभागासह जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भात रोपांच्या लागवडीसाठी पुरेसे पाणी नसल्याने शेतकर्‍यांनी तूर्त रोपांच्या लागवडी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जून महिन्यात जेमतेम 50 टक्के पाऊस झाला. संपूर्ण महिना जवळपास कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, रविवार (दि. 9) पासून वेल्हे, पानशेतच्या पूर्व भागात पावसाचा थेंबही पडला नाही. पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे खुर्द, खानापूर (ता. हवेली) आदी ठिकाणी उगवण झालेल्या भात रोपांची वाढ खुंटून भात रोपे पिवळी पडली आहेत. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. राजगड, पानशेत, वेल्हे भागात ओढ्या, नाल्यांच्या पाण्यावर तसेच पंपाने भात खाचरात पाणी साठवून काही शेतकर्‍यांनी रोपांच्या लागवडी सुरू केल्या. मात्र, पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले कोरडे ठणठणीत
पडले आहेत. त्यामुळे भात खाचरेही कोरडी पडली आहेत.

जोरदार पाऊस पडणार्‍या तोरणा, राजगडाचे धबधबेही पावसाने ओढ दिल्याने कोरडे पडले आहेत. माळावरील भात खाचरात पाण्याचा थेंबही नाही. दोन दिवसांपासून कडकडीत उन्हाळा सुरू असल्याने भात, नाचणी रोपांच्या लागवडी ठप्प झाल्या आहेत.

– विकास गायखे, शेतकरी, वेल्हे

दररोज आभाळाकडे डोळे लावून आहे; मात्र सिंहगडच्या डोंगरातही पावसाचा थेंब पडत नाही. भात रोपांसह भुईमूग, घेवडा आदी पेरणी केलेल्या बियाणांची 50 टक्केही उगवण झाली नाही. पाऊस पडला तरी भात रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

– किसन सांबरे, शेतकरी, सांबरेवाडी

लागवडीसाठी पाणी नसल्याने तालुक्यातील जवळपास 80 टक्के क्षेत्रावरील भात लागवड खोळंबली आहे. सुधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लागवड केलेल्या भात पिकांनाही पावसाची गरज आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली आहे. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईपर्यंत लागवडी करू नयेत.

– श्रीधर चिंचकर, प्रभारी कृषी अधिकारी, वेल्हे

तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाचे सर्वाधिक चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. पुरेसा पाऊस नसल्याने सिंहगड-खानापूर भागात भात रोपांच्या लागवडी झाल्या नाहीत. खरीप पिकांना पावसाची गरज आहे. गावोगाव जाऊन पाहणी करण्याच्या सूचना कृषी सहायक, मंडल कृषी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

– मारुती साळे,
कृषी अधिकारी, हवेली

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news