कोल्हापूर : संदिग्धता संपली! के.पी. पाटील अखेर हसन मुश्रीफ गटातच राहणार
गुडाळ ; आशिष पाटील राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांना साथ दिल्यानंतर त्यांच्यापासून चार हात दूर राहिलेले माजी आमदार आणि बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील ते खा. शरद पवार गटातच राहणार की ना. मुश्रीफ यांची पाठराखण करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र केपींनी ना. मुश्रीफ यांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला असून, आज सायंकाळी निवडक कार्यकर्त्यांसह ते ना. मुश्रीफ यांना भेटून आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
चार जुलै रोजी के पी पाटील समर्थकांच्या मुदाळ येथील मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी खा. शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा आग्रह धरला होता. नव्या महायुतीमध्ये केपी यांचे प्रतिस्पर्धी आ. प्रकाश आबिटकर आणि पक्षांतर्गत स्पर्धक ए वाय पाटील यांचा समावेश असल्याने केपींनी त्या कळपात न जाता खा. शरद पवार यांच्यासोबतच रहावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता.
त्यामुळेच मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या ना. मुश्रीफ यांच्या स्वागत सोहळ्याकडे आणि कागल येथील मेळाव्याकडे के पी पाटील गटाने पाठ फिरवली.
केपी यांच्यासह केडीसीसी आणि गोकुळचे संचालक असलेले त्यांचे सुपुत्र रणजीत पाटील, बाजार समिती आणि बिद्री मधील केपी पाटील गटाचे संचालक ना. मुश्रीफ यांच्या स्वागताला आणि कागल च्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत.! खुद्द खा.शरद पवार यांनी केपींना तीन वेळा दूरध्वनी करून आपल्यासोबत राहण्याची विनंती केली होती. तरीही गेली 25 वर्षे सावली सारखे ना. मुश्रीफ यांच्या सोबत राहिलेले के पी पाटील वेगळी भूमिका घेतील का? याबद्दल साशंकता व्यक्त होत होती.
बिद्रीच्या इथेनॉल प्रकल्पाचे इरादा पत्र आणि काही अंतिम मंजूऱ्या शासन पातळीवर प्रलंबित आहेत. नजीकच्या काळात बिद्रीची निवडणूक होऊ घातली आहे. राजकारणापेक्षा बिद्रीच्या आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देणाऱ्या केपी पाटील यांनी बिद्रीच्या हितासाठी राज्याच्या सत्तेत गेलेल्या ना. मुश्रीफ यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय अखेर घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Politics | १६ आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
- मुंबई : राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावल्याबद्दल शरद पवार यांना चिंता; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
- Himachal Pradesh Flood: हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधारेचा अलर्ट; आत्तापर्यंत 91 मृत्यू

