सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीस विरोध ; राज्यभर तीव्र आंदोलनाचा बापूसाहेब तांबे यांचा इशारा

सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीस विरोध ; राज्यभर तीव्र आंदोलनाचा बापूसाहेब तांबे यांचा इशारा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने नुकताच सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात रिक्त जागांवर नियुक्ती देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय अतिशय चुकीचा असून मराठी शाळेतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी केला आहे. तांबे म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये अनेक शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या शासनाने तातडीने भराव्यात. आज राज्यामध्ये उच्चशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने वर्षानुवर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असताना, हा निर्णय शासनाने कसा घेतला ? याबाबत समाजामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांचा दर्जा, गुणवत्ता उंचावत असताना व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमांच्या शाळेकडे सुरू असताना रिक्त शिक्षकांची पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. परंतु शासन रोज नवीन नवीन परिपत्रके काढून शिक्षक भरतीला विलंब करीत आहे, ही बाब शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.

इंग्रजी व गणितसाठी शिक्षक नाही
अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर शिक्षकांच्या जवळपास 250 जागा रिक्त असून मुलांना इंग्रजी व गणितसाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उच्च प्राथमिक शाळांच्या पटावर परिणाम होण्याची भीती वाढली आहे.

पालक मुलांना खाजगी शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत
अनेक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालक जिल्हा परिषदेतील शाळांतून विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत आहे. परिणामी उच्च प्राथमिक वर्ग बंद होण्याची भीती आहे.

मुख्याध्यापकांना अनावश्यक कामे
जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये उपाध्यापकांच्या जवळपास साडेचारशे जागा रिक्त आहेत. उर्दू माध्यमातील 125 पदेही रीक्त आहे. त्यामुळे शाळांच्या अध्यापनावर परिणाम होत असून मुख्याध्यापक यांना सततची ऑनलाईन अनावश्यक कामे, मिटींगा यामुळे आधीच वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे.

हजारो बेरोजगार डीएड युवकांचे काय करणार?
जर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर रिक्त जागावर नियुक्ती दिल्यास वर्षानुवर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो बेरोजगार डीएड युवक नोकरी पासून वंचित राहतील, त्यांचे काय करणार, असा सवालही तांबे यांनी केला आहे.

सुशिक्षित बेरोजगार दर्जेदारपणे अध्यापन करतील
सुशिक्षित बेरोजगार दर्जेदारपणे अध्यापनाचे काम करतील व मराठी शाळेतील मुलांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे जर हा निर्णय शासनाने मागे घेतला नाही तर या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी दिलेल्या पत्रकावर दत्ता पाटील कुलट, राजकुमार साळवे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, अंजली मुळे, विठ्ठल फुंदे, सखाहारी दाते, मनोज सोनवणे, सत्यवान मेहरे, विजय ठाणगे, आर.टी. साबळे, संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाठ,विजय नरवडे, आबा दळवी, नारायण पिसे, बाबा खरात, ना.चि.शिंदे, शरद सूद्रिक, अस्पाक शेख,संदीप ठाणगे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बापूसाहेब तांबे यांनी धोरणावर टीका करताना, पूर्ण वेतनावर शिक्षकांची भरती न करता वीस हजार रुपये मानधनावर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती करणे म्हणजे भविष्यात शिक्षक भरती न करण्याचा पुढील डाव असल्याची भिती व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news