पुणे : टोमॅटो दरवाढीचा कृषी आयुक्तांकडून आढावा
![Tomato prices stable in Chakan](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/05/30122311/123-copy-3.jpg)
पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या वेळी दिले. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण 56 ते 57 हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे 40 ते 42 हजार हेक्टर क्षेत्र, तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण 16 ते 17 हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे 10 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते.
डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच, मार्चपासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. या वर्षी पाऊस उशिरा आला असून, सरासरीच्या 54 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे लागवडीस उशीर झाला आहे, असेही या वेळी चव्हाण यांनी सांगितले.
टोमॅटो पिकावरील कीड व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये टोमॅटो लागवडीचे प्रमुख क्षेत्र असून, सर्व संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांनी नवीन लागवडीबाबत सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही चव्हाण यांनी या वेळी दिल्या. बैठकीला सर्व कृषी विद्या पीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, तसेच सर्व जिल्ह्यांचे अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा
नगर : सुप्यातील काळे टोळी हद्दपार ; पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा दणका
परभणी : भगवान सानप बीआरएस मध्ये दाखल; गंगाखेड विधानसभेचं राजकीय समीकरण बदलणार