छगन भुजबळ धमकी प्रकरण : आरोपीची अटक बेकायदा

छगन भुजबळ धमकी प्रकरण : आरोपीची अटक बेकायदा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक ही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आरोपी तरुणाची त्वरित सुटका करण्यात आली.

या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. प्रशांत दशरथ पाटील (वय 24) असे सुटका झालेल्याचे नाव आहे. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून अटक करण्यात आली होती.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने हालचाली करीत मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरून त्या तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. संबंधित तरुणाने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. अटक झाल्यानंतर आरोपीने वकील न पुरविल्याने त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पुरविण्यात आला होता. लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधिज्ञ अ‍ॅड. सचिन साळुंके यांनी आरोपीची बाजू मांडली.

अर्नेश कुमार विरुद्ध बिहार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सात वर्षांच्या आत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याला नोटीस पाठवणे आवश्यक आहे. तसेच, गुन्हा अदखलपात्र असल्याने त्याची चौकशी व अटक करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. या दोन्ही बाबी पोलिसांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे आरोपीला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे, अशा युक्तिवाद अ‍ॅड. साळुंके यांनी केला. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीला सोडण्याचे आदेश दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news