ठाणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 45 जागा आणि विधानसभेच्या 152 जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महायुतीची 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची रणनीती आखल्याची घोषणा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी भिवंडी येथे आयोजित भाजप प्रशिक्षण शिबिरावेळी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसच्या आमदारांना भाजपची दारे उघडी आहेत. येतील त्या सर्वांच्या गळ्यात भाजपचा दुप्पटा टाकू, असे ते म्हणाले.
भाजपचे राज्यातील केंद्रीय मंत्री, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर भिवंडीत आयोजित करण्यात आले. शिबिराला राज्यातील 560 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना भाजपच्या महाविजय 2024 च्या मिशन अंतर्गत निवडणूक रणनीतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील एक लाख बूथवर कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येक बूथवर 50 कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देण्याचे नियोजन आहे. 288 विस्तारक कामाला बाहेर पडतील. कुठल्याही परिस्थितीत भाजपला 152 जागा जिंकायच्या आहेत. जेवढ्या जागा वाट्याला येतील, त्यापैकी 80 टक्के जागा जिंकू. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महायुतीची 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची रणनीती आखण्यात आली आहे. अगोदरच भाजपच्या 106 जागा अधिक 10 अपक्ष आहेत. कोणताही वाद न होता भाजप 152 जागा जिंकेल, अशा जागा लढविणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याची भीती अध्यक्ष नाना पटोले यांना वाटत असल्याने ते सरकार बरखास्त करण्याची मागणी करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यात महायुतीचे आगामी पंधरा वर्षे सरकार राहणार असून, महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विक्रमी जागा जिंकू, असा दावा बावनकुळे यांनी केला.