पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; महापालिकेचे आवाहन | पुढारी

पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; महापालिकेचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)पासून तयार केलेल्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याने नागरिकांनी पीओपीच्या गणेश मूर्ती खरेदी न करता येणारा गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जनाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार महापालिकेनेही पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेश काढला आहे. तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

त्यानुसार नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडून मूर्ती खरेदी करावी, तसेच येणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे

  • पारंपरिक शाडू माती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करावी.
  • मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर करू नये.
  • मूर्तींचे दागिने वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा
  • मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर करावा.
  • मूर्ती रंगविण्यासाठी रासायनिक रंग, ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसचा वापर करू नये.
  • नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत.
  • मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणार्‍या रंगाचा वापर करावा.

हेही वाचा

पुणे : रस्ता खोदाईसाठी परवानगी बंधनकारकच

पुणे : कात्रज चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पालिका देणार 21 कोटी

भाजपचे राज्यात ‘मिशन 152’; महायुती म्‍हणून २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्‍प

Back to top button