पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या प्रश्नांविषयी अधिक माहिती अजित पवार यांनाच असल्याने त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. या वेळी वैशाली नागवडे, हनुमंत कोकाटे, प्रदीप देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गारटकर म्हणाले, राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.
बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्न आगामी काळात कसे सोडविता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यांतील तालुकाध्यक्ष वगळता अन्य तालुक्यांतील तालुकाध्यक्ष या वेळी उपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सहकारी संस्था, साखर कारखाने, बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, कात्रज दूध संघांचे पदाधिकारी उपस्थित होते, असेही गारटकर यांनी सांगितले.
बूथ सर्वेक्षण अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकार्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तातडीने भरून देण्याविषयी निर्णय झाला आहे, तसेच जिल्ह्याच्या काही तालुक्यांतील आमदार अजूनही संदिग्ध आहेत. अशा तालुक्यात पक्ष संघटनेमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही गारटकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आयोजित केलेल्या बैठकीमधील बॅनरवरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो गायब होते. याविषयी प्रदीप गारटकर म्हणाले की, शरद पवार यांनी माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे सांगितले आहे. त्यांना परवानगी मागण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यामुळे त्यांचा फोटो वापरला नाही; मात्र त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, ती कमी झालेली नाही आणि होणारही नाही, असे स्पष्ट केले.
मी 2002 मध्ये राजकारण सुरू केले असून, त्यानंतर महानंद दूध, पंचायत समितीवर काम केले आहे, तर खासदार सुप्रिया सुळे या 2007 मध्ये राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा राजकारणात सीनियर आहे, असे वैशाली नागवडे म्हणाल्या.
जयंत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांना जिल्हाध्यक्षपदावरून बडतर्फ केल्यानंतर अजित पवार गटाच्या पक्षाचे सुनील तटकरे यांनी गारटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर ही पक्षाची पहिलीच बैठक होती. जिल्ह्यातील पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यांतील तालुकाध्यक्षांनी अनुपस्थित राहत शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित तालुक्यांतील अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. तीन तालुक्यांमध्ये नवीन अध्यक्ष निवडले जाणार आहेत.
हेही वाचा