पुणे; पुढारी वृत्तसेवा : अधिकृत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल न देणार्या महापालिकेच्या पाचही परिमंडळाच्या उपायुक्तांना वेतनवाढ व पदोन्नती थांबविण्याची नोटीस बजावण्यात येणार आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी दिली. पिंपरी-चिंचवड येथे होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेच्या हद्दीतील होर्डिंगची माहिती संकलित करण्याचे व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. दिलेल्या मुदतीमध्ये माहिती न दिल्यास परिमंडळाचे उपायुक्त व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्तांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये माहिती दिली नाही. ज्यांनी माहिती दिली त्यांतील बहुतेकांनी ती परिपूर्ण दिली नाही. त्यात होर्डिंग कोसळण्याची आणखी एक घटना घडली. त्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. तसेच अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्यास होर्डिंग मालकांना सांगण्यात आले.
याबाबतचा अहवाल आकाशचिन्ह विभागाला पाठविण्याची जबाबदारी पाच परिमंडळांच्या उपायुक्तांवर सोपविण्यात आली होती. त्यानंतर माहिती न पाठविणार्या उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. तेव्हा अहवाल सादर करण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ पूर्ण झाल्यानंतरही उपायुक्तांकडून अहवाल सादर केला गेला नाही. यामुळे वेतनवाढ आणि पदोन्नती का रोखू नये, अशी नोटीस संबंधित उपायुक्तांना पाठविली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी सांगितले.
हेही वाचा