शिक्रापूर : करंदी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी सुरू | पुढारी

शिक्रापूर : करंदी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी सुरू

शिक्रापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ‘आदर्श संसद ग्राम’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या करंदी (ता. शिरूर) ग्रामपंचायतीत सरपंच सोनाली ढोकले व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने गैरकारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा घोळ माहिती अधिकारात उघड झाल्याने गैरकारभाराची चौकशी करत दोषी सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह ग्रामविकास अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. अखेर या ग्रामपंचायतीच्या कारभाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी सुरू केली आहे.

करंदी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य हे संगनमताने चुकीचे ठराव घेणे, मनमानी करणे, लाखोंचा भ्रष्टाचार करणे आदी चुकीच्या बाबी करत असल्याचे समोर आल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोकले, नितीन ढोकले, शारदा ढोकले, सुभद्रा ढोकले, अंकुश पंचमुख, सुनीता ढोकले, रेखा खेडकर यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली.

नुकतेच अजिंक्य येळे, विस्ताराधिकारी एस. के. शिंदे, कनिष्ठ अभियंता एम. आर. सरोदे, एन. आर. बडे, शाखा अभियंता योगेश दिवेकर यांच्या पथकाने ग्रामपंचायत कार्यालय करंदी येथे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह तक्रारदार महेश साबळे पाटील यांच्या उपस्थितीत चौकशी सुरू केली. ही चौकशी सुरू झाल्याने अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

करंदी ग्रामपंचायतीबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांची कागदपत्रे सादर होताच त्याची छाननी करत योग्य तो अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल.

– अजिंक्य येळे, चौकशी अधिकारी

हेही वाचा

पीक विम्यासाठी फक्त एक रुपया द्यावा; कृषी विभागाचे आवाहन

सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण

सातारा : पाटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

Back to top button