पीक विम्यासाठी फक्त एक रुपया द्यावा; कृषी विभागाचे आवाहन | पुढारी

पीक विम्यासाठी फक्त एक रुपया द्यावा; कृषी विभागाचे आवाहन

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयात पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकर्‍यांनी याव्यतिरिक्त पैसे देऊ नये, असे आवाहन हवेली तालुका कृषी विभागाने केले आहे. शेतकर्‍यांकडून जादा पैसे घेऊ नयेत अशा सूचना ई सेवा केंद्र चालकांना करण्यात आल्या आहेत. यासाठी ई सेवा केंद्राची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले, शासन एका शेतकर्‍याच्या पीक विम्यासाठी 40 रुपये देणार आहे. ई सेवा केंद्रचालक शेतकर्‍यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करीत असल्यास शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी. तीन वर्षांसाठी अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे.

यात शेतकर्‍यांना केवळ 1 रुपया भरून सहभागी होता येत आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वत: शेतकर्‍यांना, तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक ई सेवा केंद्र यांच्यामार्फत नोंदणी करता येणार आहे. हवेली तालुक्यात एक लाखाहून अधिक शेतकरी आहेत. त्यातील पंचवीस हजारांहून अधिक शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तालुक्यात दीडशेहून अधिक ई सेवा केंद्र आहेत. 31 जुलैपर्यंत शेतकर्‍यांना पीक विमा नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा

सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण

सातारा : पाटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

सातार्‍यात दोघांना ९४ लाखांचा चुना; सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने फसवणूक

Back to top button