सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण | पुढारी

सातारा : जिल्ह्याला साथीच्या आजारांचा ‘ताप’; अतिसाराचे ११०४ रुग्ण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्दी ताप, खोकल्याच्या आजाराचे रूग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यातील 3 हजार 878 जणांना ताप तर 1 हजार 104 जण अतिसाराने आजारी आहेत. तर 38 ठिकाणचे पाणी दुषित आढळले आहे.

सध्याच्या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य वर्धिनी केंद्र, आपला दवाखाना रुग्णालयामधील बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी रूग्णांची संख्या वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या विविध पथकांनी 701 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी 38 ठिकाणचे पाणी नमुने दुषित असल्याचे आढळून आहे. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला आरोग्य विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 153 ठिकाणी टीसीएल पावडरचे नमुने घेण्यात आले. 11017 ओटी टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 161 ओटी टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात 1 हजार 104 जणांना अतिसार व 57 जणांना हगवणीची लागण झाली असून 3 हजार 878 रुग्ण तापाने आजारी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

वातावरणात झालेला बदल, दूषित पाणी यामुळे तापाच्या रूग्णांबरोबरच उलट्या होणे, घसा दुखणे, पोटाचे विकार आदींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता तर पावसाने पुर्णत: उघडीप दिली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत चालला आहे. पावसाळी पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. बाहेर गेल्यावर अनेकांच्या खाण्या पिण्यात उघड्यावरचे अन्न आणि दुषित पाणी येते. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील उघड्यावरचे अन्न खाणे आणि दुषित पाणी पिणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट

जिल्ह्यात पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील बदल व डासांच्या उत्पत्तीमुळे विविध किटकजन्य आजारांच्या रूग्ण संख्येत वाढ होवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यात डेंग्यू व चिकूनगुन्या या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त होताच संबंधित रुग्णावर आरोग्य विभागामार्फत त्वरित उपचार करण्यात येत आहेत. आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. डेंग्यू, चिकूनगुन्या व हिवतापबाबत गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून डेंग्यू, चिकूनगुन्या व हिवतापाबाबत नागरिकांनी घाबरून नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी केले.

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळ पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. जुने टायर व भंगार साहित्य नष्ट करावे जेणे करून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचा ताप अथवा रूग्ण आजारी पडल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार करावे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Back to top button