सातारा : पाटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर | पुढारी

सातारा : पाटण तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

मारुल हवेली; धनंजय जगताप :  यावर्षी उशिरा आगमन होऊन देखील पाटण तालुक्यात अद्याप पावसाचा जोर नाही. परिणामी तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात केवळ 53 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद असून भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी पिकांकडे शेतकर्‍यांचा अधिक कल आहे.

दरम्यान, तालुक्यात सरासरी 135 मि.मी. पावसाची नोंद झाली असून पडलेला पाऊस व झालेली पेरणी ही गत वर्षीच्या तुलनेने कमी आहे. चांगले पर्जन्यमान असलेल्या पाटण तालुक्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. परंतु जुलै महिना सुरू होऊनदेखील अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुरेशा प्रमाणात पाऊस नसला तरी हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी आपल्या पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी कमी असून एकूण क्षेत्राच्या केवळ 53 टक्केच पेरण्या आटोपण्यात आल्या आहेत.

यामध्ये भात पीक 6213 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आले आहे. ज्वारी 3746 हेक्टर, भुईमूग 9223 हेक्टर, सोयाबीन 7568 हेक्टर, नाचणी 105, मका 542 हेक्टर, तुर 209 हेक्टर, उडीद 194 हेक्टर, मूग 76 हेक्टर, सूर्यफुल 26 हेक्टर, अन्य कडधान्ये 304 हेक्टर तर अन्य तृणधान्ये 64 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहेत. तसेच पावटा, घेवडा, मटकी, वरी आदी पिकासह ऊस पीक घेण्यात आले आहे. कोयना धरण परिसरात पावसाची रिपररिप सुरू आहेत. तर तालुक्याच्या पूर्वेला उघडीप आहे. पावसाची उघडझाप सुरू असल्याने काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणी पेरणी झालेल्या शेतात भांगलण व कोळपणीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. ज्यादा क्षेत्रावर खरीप पिके घेतली गेल्याने पालेभाज्या व फळभाजीचे क्षेत्र कमी झाले आहे. बाजारपेठेत येणारी आवक घटल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे.

Back to top button