पुणे : वाहतुकीच्या सर्वाधिक तक्रारी; पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर समस्यांचा पाऊस | पुढारी

पुणे : वाहतुकीच्या सर्वाधिक तक्रारी; पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर समस्यांचा पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तक्रारी, सूचना आणि केलेल्या कामाच्या अभिप्रायासाठी पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक वाहतुकीच्या संदर्भातील तक्रारींची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते जाम, चौकांमध्ये कोंडी, नादुरुस्त सिग्नल आदींबाबत या तक्रारी आहेत. तर, अनेकांनी पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

नागरिकांना शहर परिसरातील तक्रारी, सूचना आणि पोलिसांनी केलेल्या कामाचा अभिप्राय देता यावा म्हणून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी 8975953100 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला आहे. 10 तारखेपासून हा नंबर पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नंबरवर नागरिकांना सर्व प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत. आलेल्या तक्रारींची संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक विभागाकडून तत्काळ दखल घेतली जाते. शहरात जवळपास 27 वाहतूक विभाग आहेत.

तर, वाहतूक नियमनासाठी प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस उभे असतात. मात्र, अनेकदा चौकाच्या काही अंतर पुढे कारवाईसाठी पोलिस थांबल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळते. पीक अव्हर्सदरम्यान देखील कारवाया सुरू असल्याने अनेकदा चौकांमध्ये गर्दी दिसून येते. यातच आता नागरिकांकडून देखील सर्वाधिक वाहतुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बेशिस्त पीएमपीएल, रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी

वाहतूक चौकामध्ये पोलिस घोळक्याने उभे असल्याचे एका तक्रारदाराने म्हटले आहे. तर, पोलिसांकडून केवळ दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईवर भर देण्यात येत असून, बेशिस्त पीएमपीएल चालक, रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या तक्रारदाराने केली आहे.

सुधारणेबाबत उत्सुकता

मागील तीन दिवसांत सर्वाधिक 43 तक्रारी या वाहतुकीबाबत आल्या आहेत. तर, ध्वनिप्रदूषणाबाबत नऊ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरात नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अरुंद रस्ते, त्यामध्ये रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा फटका बसतो. यातच पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडणे, खड्डे अशा समस्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. पुणेकरांच्या सर्वाधिक तक्रारींमध्ये वाहतूक तक्रारी पहिल्या क्रमांकावर असल्याने आता वाहतूक पोलिस त्यादृष्टीने सुधारणा करणार का, हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा

मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला मिळणार संधी? यांची नावे चर्चेत

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

यवतमाळ : अत्याचार करुन महिलेला विष पाजल्यामुळे पीडितेचा मृत्यू

Back to top button