

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वडगाव निंबाळकर ते कोर्हाळे खुर्द रस्त्यावरील खोमणेवस्ती येथील चारीवर बांधण्यात आलेला पूल खड्ड्यात गेला आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून, या कामाच्या चौकशीची मागणी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून पवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
वडगाव निंबाळकर ते कोर्हाळे खुर्द रस्त्यावर वडगावच्या हद्दीत खोमणे वस्ती येथे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी पुरामुळे जुन्या पुलातून जात नव्हते. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी पाहणी केली. त्यानुसार संबंधित पुलाची उंची वाढविण्याचे सुचविण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी प्राप्त झाला. या पुलाचे काम सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले.
संबंधित एजन्सीला ग्रामपंचायतीने वारंवार सूचना दिल्या. परंतु, त्यांनी कोणालाही न जुमानता निकृष्ट काम सुरूच ठेवल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. या ठेकेदाराने पुलाची उंची सध्या असलेल्या रस्त्यापेक्षा एक फुटाने कमी ठेवली आहे.
त्यामुळे नवीन पुलाचे काम करूनही पुन्हा पावसाळ्यातील धोका कायम राहिला आहे. तसेच काँक्रिटमध्ये दगड वापरून काम केले आहे.
ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंबंधी चौकशी करण्यात आली. त्यांनी येथील सरपंच सुनील ढोले यांना अत्यंत वाईट भाषा वापरून ठेकेदाराचीच पाठराखण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना ग्रामपंचायतीला विचारात घेतले नाही. पुलाची जागा, त्याची उंची याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. सध्या करण्यात आलेल्या पुलामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम राहणार असून, लोकवस्तीत पाणी शिरेल अशी स्थिती आहे. ठेकेदाराने काँक्रिटमध्ये दगडाचा वापर का केला, अशी विचारणा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी केल्यावर त्यांनाच दरडावण्यात आले.
हेही वाचा