Ashadhi wari 2023 : पुणे जिल्ह्यात पालखीचे स्वागत; माउलींच्या पादुकांना परतीच्या प्रवासात निरा स्नान | पुढारी

Ashadhi wari 2023 : पुणे जिल्ह्यात पालखीचे स्वागत; माउलींच्या पादुकांना परतीच्या प्रवासात निरा स्नान

निरा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीहून परतीच्या प्रवासात सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याच्या सीमेवर निरा येथे शनिवारी (दि.8) सकाळी 9.30 वाजता प्रवेश केला. दरम्यान, परतीच्या प्रवासात माउलींच्या पादुकांना निरा नदीच्या तीरावरील प्रसिद्ध दत्तघाटावर प्रथेप्रमाणे ममाउली..माउलीफच्या नामघोषात निरा स्नान घालण्यात आले. पाडेगाव (ता. फलटण) येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा शनिवारी सकाळी नऊ वाजता निरा नदीकाठावरील श्री दत्तमंदिराजवळ आला.

या वेळी माउलींच्या पादुकांना आळंदी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, सतीश शिंदे, चोपदार बाळासाहेब रणदिवे यांनी निरा नदीच्या पवित्र तीर्थाने स्नान घातले. या वेळी वारक-यांनी ममाउली …… माउलींफचा जयघोष केला. निरा स्नानानंतर आरती करण्यात आली.

पालखी सोहळ्याचे निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावात स्वागत केले. रथ अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेतली. दुपारच्या विसाव्यासाठी पालखी श्री विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वारक-यांना अन्नदान करण्यात आले. या वेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, लक्ष्मणराव चव्हाण, प्रमोद गवळी आदी उपस्थित होते. निरेतील दुपारचा विसावा संपवून पालखी सोहळा दुपारी दीडच्या दरम्यान वाल्हेनगरीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. या वेळी निरा पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहायक उपनिरीक्षक संदीप मोकाशी, राजेंद्र भापकर, नीलेश करे, नीलेश जाधव आदींसह पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी बंदोबस्त
ठेवला होता.

हेही वाचा

हिरकणी आता नव्या रूपात; पुण्यातील कार्यशाळेत 120 बसची बांधणी सुरू

लेटलतिफ ’सेट’ला नेमका मुहूर्त कधी? 2022 ची परीक्षा यंदा मार्चमध्ये घेतली

पोषक वातावरण नसल्याने राज्यात पावसाचा जोर कमी; कोकणच्या काही भागांत मुसळधार

Back to top button