आतापर्यंत 4 कोटींहून अधिक सात-बारा उतारे डाऊनलोड

आतापर्यंत 4 कोटींहून अधिक सात-बारा उतारे डाऊनलोड

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाभूमी संकेतस्थळ सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार कोटी 37 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारे, एक कोटी 37 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त आठ-अ, 13 लाख 58 हजार फेरफार आणि आठ लाख 16 हजार मिळकत पत्रिका डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यातून शासनाला 112 कोटी 61 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. शासकीय असो की, खासगी या कामांसाठी सात-बारा खाते उतार्‍यासह फेरफार आणि इतर कागदपत्रे काढावी लागतात.

यासाठी तलाठी आणि तहसीलदारांकडे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने सर्व कागदपत्रे काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली. त्यामुळे नागरिकांना तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. त्यामुळेच ऑनलाईन कागदपत्रे डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे.

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा आणि आठ-अ उतारे नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकत पत्रिकादेखील आता मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी-विक्री यासाठी सात-बारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत.

त्यानुसार 6 जुलै रोजी महाभूमी या संकेतस्थळावरून विक्रमी दोन लाख 15 हजार इतकी कायदेशीर कागदपत्रे डाऊनलोड करण्यात
आली. यामध्ये सर्वाधिक एक लाख 48 हजार 726 सातबारा उतारे, तर 55 हजार 732 खाते उतारा डाउनलोड केल्या आहेत. या संकेतस्थळावर सात-बारा, खातेउतारा डाऊनलोड करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. नागरिकांना आपले खाते या संकेतस्थळावर तयार करता येते किंवा ओटीपी देऊनसात-बारा डाऊनलोड करण्याची सुविधा वापरता येते, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान कक्ष महसूल विभागाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी सांगितले.

उतारे, मिळकतपत्रिका मिळण्याची सुविधा

जमाबंदी आयुक्तालयाने संकेतस्थळावरून ऑनलाईन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा, आठ-अ उतारे आणि मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी कामकाजासाठी हे उतारे ग्राह्य धरले जातात. संकेतस्थळावर विनाशुल्क डिजिटल स्वाक्षरी नसलेले; पण माहितीसाठीचे उतारे उपलब्ध आहेत. या उतार्‍यांचा वापर सरकारी कामकाजासाठी करता येत नसल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news