पुणे : पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने रखडली कारवाई | पुढारी

पुणे : पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने रखडली कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील गोदामांना आग लागल्यानंतर महापालिकेने सर्व्हे करत अनधिकृत तब्बल 371 गोदामांना चोवीस तासाची मुदत देत नोटिसा दिल्या. मात्र, त्यानंतर पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने अद्याप या गोदामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये गंगाधाम ते कात्रज-कोंढवा रस्त्यालगतचा परिसर हिलटॉप, हिलस्लोपमध्ये (बीडीपी) आहे.

असे असतानाही या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभारलेली आहेत. ही गोदामे झाल्याने त्यांना तीनपट टॅक्स आकारला आहे. तसेच, बांधकाम विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावून काही गोदामे जमीनदोस्त केली. परंतु,
यानंतरही अनेकांनी नोटिसांविरोधात न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे.

दरम्यान, शहरातील टिंबर मार्केट येथे मोठी आग लागून नुकसान झाले होते. त्यानंतर 18 जून रोजी बिबवेवाडी येथील बीडीपीमधील अनेक गोदामांना आग लागून मोठे नुकसान झाले. पहिल्या आगीच्या घटनेनंतर कोणतेही ठोस पाऊल न उचललेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेनंतर मात्र बेकायदा गोदामे आणि मंगल कार्यालयांचा सर्व्हे करून मोठी कारवाई करण्याची घोषणा केली होती.

यानंतर महापालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये 371 गोदामे बेकायदा उभारल्याचे आढळले. या गोदामांना महापालिकेने 21 ते 23 जून दरम्यान नोटीस बजावून चोवीस तासात गोदामे खाली करून स्ट्रक्चर काढून घेण्याच्या सूचना केल्या. स्वतःहून न काढल्यास पालिकेकडून कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला.

मात्र, त्यानंतर महापालिकेने कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला. त्यानंतर 23, 27 जून आणि 4 जुलै रोजी कारवाईचे नियोजन करण्यात आले. मात्र, दरवेळी पोलिसांनी बंदोबस्त देण्यास विविध कारणे दिल्याने अनधिकृत गोदामांवर अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

चांदोली धरणात 7,083 क्यूसेक पाण्याची आवक

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक 15 जुलैनंतर पूर्ववत

सांगलीत महिला पोलिसावर बलात्कार

Back to top button