पुणे : पोलिस आयुक्त, सह आयुक्त थेट फिल्डवर | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त, सह आयुक्त थेट फिल्डवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात ऑल आउट ऑपरेशन राबविले. त्यामध्ये स्वतः पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावर उतरून ऑपरेश ऑल आउटची पाहणी केली. पोलिस आयुक्तांनी शिवाजीनगर, खडक, खडकी, चतुःशृंगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिस चौक्यांना भेट दिली. या वेळी त्यांनी नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

ऑपरेशनदरम्यान 129 कारवायांमध्ये तब्बल 165 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांची झाडाझडती करीत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हॉटेल, लॉज, धाबे, बस स्थानके, रेल्वे स्थानके तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांची पथके कारवाईसाठी तयार करण्यात आली होती. तर वाहतूक शाखेकडून 1822 संशयित वाहनांची तपासणी करून 568 वाहनांवर कारवाई करून 4 लाख 63 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आरोपींच्या तपासणी अभियानात 1994 गुन्हेगारांचा माग काढण्यात आला, त्यापैकी 695 गुन्हेगार मिळून आले.

यातील 24 जणांना आर्म अ‍ॅक्टनुसार अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिस्तूल आणि 23 धारदार हत्यारे हस्तगत केली. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये मपोका 145 कायद्याप्रमाणे एकास अटक करण्यात आली. अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक करून गांजा आणि अफीम असे 1 लाख 75 हजार रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.

मुंबई प्रोव्हिबिशन अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हे शाखेने 14 आणि पोलिस ठाण्याने 159 केस करून 85 लाखांची गावठी दारू जप्त केली. महाराष्ट्र जुगार अ‍ॅक्टप्रमाणे 55 आरोपींना अटक करून सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, प्रवीण पाटील, रंजन कुमार शर्मा, उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उप आयुक्त संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

पुणे : पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने रखडली कारवाई

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक 15 जुलैनंतर पूर्ववत

बँक फोडण्याचा डाव फसला; भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न

Back to top button