पुणे; पुढारी वृत्तसेवा : सातबारा उतार्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा उतरवणे किंवा चढविणे यासह महत्त्वाच्या कामांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने 'ई-हक्क' प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत अर्ज दाखल करण्यासह दाखल अर्जांमध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या प्रणालीत अर्जदाराच्या लॉगइनमध्ये कळविण्यात येणार असून, त्रुटींची पूर्तता देखील अर्जदाराला करता येणार आहे.
फेरफार नोंदी करण्यासाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. मात्र, आता तलाठ्याकडे न जाता नोंदीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य शासनाने 'ई- हक्क' प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविण्यात आले आहेत. तर फेरफारांपैकी केवळ 26 लाख 50 हजार नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत. या संकेतस्थळावर अर्जदार हे कधीही आपला अर्ज दाखल करू शकतात आणि तलाठी हा अर्ज कधीही पाहून त्याच्यावर अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात.
त्यामुळे वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. या संकेतस्थळाला भेट देऊन जिल्हा, तालुका आणि गाव निवडून त्यावर फेरफार अर्जाची परिपूर्ण माहिती भरल्यानंतर हा अर्ज थेट तलाठ्याच्या लॉगीनमध्ये दिसणार आहे आणि तो अर्ज मंजूर करून तलाठी ती फेरफार नोंद घेऊ शकणार आहे.
दरम्यान, अर्जामध्ये त्रुटी असेल, तर ती त्रुटी तलाठ्याकडून संकेतस्थळावर अर्जदाराच्या लॉगीनमध्ये कळविण्यात येईल आणि त्या त्रुटीची पूर्तता अर्जदाराला तेथेच करता येईल. त्यामुळे तलाठी आणि फेरफार नोंदीसाठी इच्छुक अर्जदार यांच्यामध्ये हा एक दुवा या प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा