खानापूर; पुढारी वृत्तसेवा : महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे गंगवाळी आणि माणिकवाडी गावच्या फाट्यावर निर्माण झालेली दलदल आणि त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय याबाबत दै.'पुढारी'ने बुधवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच 24 तासांच्या आत या समस्येवर कार्यवाही झाली आहे. कंत्राटदाराच्या या युद्धपातळीवरील कार्यवाहीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
बुधवारी सकाळीच कंत्राटदाराने गंगवाळी गावच्या फाट्यावर जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून दुरुस्ती कार्य सुरू केले. तर माणिकवाडी संपर्क रस्त्याची फाट्याच्या ठिकाणी दोन दिवसांत दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. महामार्गाला जोडणार्या संपर्क रस्त्यांची वाताहत झाल्याने त्याचा विद्यार्थी व प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाला ज्या ठिकाणी गावचा संपर्क रस्ता येऊन मिळतो तेथे पुरेशी दक्षता घेऊन संपर्क रस्त्याची उंची वाढवून काम होणे आवश्यक आहे. यामुळे गावातून येणारे वाहन महामार्गावर चढताना समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक होते. पण चढती कमी करणे तर दूरच उलट माती टाकून अशा ठिकाणी चिखलाचे साम्राज्य तयार झाल्याने वाहनच काय तर पायी चालत जाणे देखील कठीण झाले आहे.
'पुढारी'तून वृत्त प्रसिद्ध होताच कंत्राटदाराचे डोळे उघडले असून गंगवाळी गावच्या फाट्यावरील चिखलाची दलदल दूर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून आता माणिकवाडी गावच्या रस्त्याचीही त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.