अतिउत्साही तरुणांच्या उत्तरांनी पोलिसही चक्रावले | पुढारी

अतिउत्साही तरुणांच्या उत्तरांनी पोलिसही चक्रावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘आम्ही काय चूक केली आहे. लायसन्स घरी राहिले आहे. आम्ही मेन रोडवर गाडी चालवत नाही, मग लायसन्स कशाला हवे. आम्हाला सोडा, आम्ही काय मोठा गुन्हा केला आहे’, ही उत्तरे आहेत, अतिउत्साही तरुणांची. पोलिसांच्या तपासणी मोहिमेत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान, या तरुणांच्या उलट प्रश्नांनी पोलिसही चक्रावले आणि सुरक्षेसह सामाजिक शांततेबाबत तरुणाईचा बेजबाबदारपणा पाहून निरुत्तरही झाले.

शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस चांगलेच आक्रमक झाले आहेत. कॉलेज परिसरात दंगा करणार्‍या रोडरोमियोंवर विशेष लक्ष ठेवले जाते आहे. सिंहगड रोड पोलिसांनी अचानक बुधवारी सायंकाळी रस्त्यावर तपासणी मोहीम हाती घेतली. या वेळी तपासणीसाठी थांबविलेल्या युवक-युवतींनी वेगवेगळी उत्तर दिल्याने नाकाबंदी करणारे पोलिसही चक्रावले. तर अनेकांकडे लायसन्सही नव्हते. ‘आम्ही काय मेन रोडवरती गाडी चालवतो का, लायसन घरी राहिले आहे. आता सोडा, पुन्हा चूक होणार नाही’, अशी वेगळी उत्तर त्यांनी पोलिसांना दिली.

पोलिस व वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, विनापरवाना, ट्रिपल सीट, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वाहन चालवणे अशा केसेस केल्या आहेत. यामध्ये बुलेटचालकांवर कर्णकर्कश आवाज काढल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली विनाकारण महागड्या गाड्या घेऊन फिरणार्‍यांवर कॉलेज प्रशासनाच्या टीमसोबत शोध घेतला जाणार असून, त्यांच्यावर वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शाळा, महाविद्यालय परिसरात घिरट्या घालणार्‍या रोडरोमियोंनी चांगलीच धास्ती घेतली आहे. मुलीही ट्रिपल सीट गाडी चालवताना या नाकाबंदीमध्ये आढळून आल्या आहेत.

पायी गस्त घालत असताना, नाकाबंदी लावली. मुलांसोबत मुलीदेखील ट्रिपल सीट गाडी चालवत आहेत. त्यांच्याकडून हास्यास्पद उत्तरे दिली जात आहेत. अनेकांकडे वाहन चालविण्याचे परवाने नव्हते. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

– अभय महाजन,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड

हेही वाचा

अजित पवार-जयंत पाटील येणार आमने-सामने

पुणे : वाहतुकीच्या बेशिस्तीवर शासकीय वाहनांद्वारे वॉच

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Back to top button