पुणे : वाहतुकीच्या बेशिस्तीवर शासकीय वाहनांद्वारे वॉच | पुढारी

पुणे : वाहतुकीच्या बेशिस्तीवर शासकीय वाहनांद्वारे वॉच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘यु 4 यु सोसीओटेक’ या कंपनीने तयार केलेले अद्ययावत कॅमेरे 1 जुलैपासून 10 शासकीय वाहनांमध्ये बसविण्यात येऊन वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहनचालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्वाहतुकीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

शहरातील मुख्य चौकांत, रोडवर तसेच इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या अनुपलब्धतेमुळे दंडात्मक चलन कारवाई करता येत नाही. ही बाब लक्षात घेता यापुढे शासकीय व खासगी वाहनांवर कंपनीमार्फत कॅमेरा बसविलेल्या वाहनांद्वारे शहरातील सर्व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर फिरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन व वाहनचालकाचे फोटो घेतले जाणार आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांची माहिती दंडात्मक चलन कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना उपलब्ध होणार आहे. भविष्यात या कॅमेर्‍यांमुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार आहे. पर्यायाने वाहतुकीस शिस्त लागून वाहतूक सुधारणा होण्यास मदत होणार आहे. कारवाईसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी 10 पोलिस वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

सुरुवातीला दहा शासकीय, तर नंतर खासगी वाहनांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून भविष्यातील वाहतूक नियमभंगावरील तोडगा काढण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

– विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

हेही वाचा

पुणे : अवैध गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त; एकवीस जणांना अटक

पुणे : घरफोड्यांत 11 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर : ‘उच्च शिक्षण सहसंचालक’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर!

Back to top button