पुणे : घरफोड्यांत 11 लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पुणे : घरफोड्यांत 11 लाखांचा ऐवज लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागात चार घरफोडींच्या घटना समोर आल्या आहेत. बंद सदनिका व हार्डवेअरच्या दुकानावर डल्ला मारून रोकड, सोन्याचे दागिने असा तब्बल 11 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून 2 लाख 39 हजार 900 रुपये किमतीच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. या प्रकरणी रामचंद्र मारुती कटरे (वय 36, रा. सहयोगनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने कटरच्या साह्याने सदनिकेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून 1 लाख 39 हजार 900 रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

दुसर्‍या घटनेत लोणीकंद परिसरातील एका घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. याप्रकरणी लक्ष्मी निवृत्त केंद्रे (वय 64, रा. दत्तनगर, लोणीकंद) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी लक्ष्मी यांच्या घरी कोणीच नव्हते. चोरट्यांनी याचा फायदा घेत धान्याच्या कोठ्यातील 3 लाख 95 हजार रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

तिसर्‍या घटनेत केसनंद फाट्याजवळ असणार्‍या इलेक्ट्रिकल्स आणि हार्डवेअरच्या दुकानातील ड्रॉवरमधली 5 लाखांची रोकड चोरट्यांनी चोरी केली. दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. या प्रकरणी कुमार पाटीलबुवा आव्हाळे (वय 37. रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आव्हाळे यांचे केसनंद फाट्याजवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकान बंद असल्याचा फायदा घेत ड्रॉवरमध्ये ठेवलेली 5 लाखांची रोख रक्कम आणि 50 हजार रुपयांचा डीव्हीआर पळविला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

धानोरीत नेकलेसची चोरी

धानोरी भागातील एका सदनिकेचे लॉक तोडून 45 हजार किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी स्मिता बजरंग राणे (वय 40, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी राणे यांच्या सदनिकेचे लॅच लॉक तोडले आणि त्यानंतर कपाटातील 45 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरला. सहायक पोलिस निरीक्षक शेख तपास करत आहेत.

हेही वाचा

ड्रायपोर्ट सलगरे येथेच; जागेचा प्रश्न मिटला

पुणे : लेखक सत्याला सामोरे जात नाहीत; नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची खंत

सिंधुदुर्ग : कणकवली-कनेडी मार्गावर एस.टी.-दुचाकी अपघातात दोघे ठार

Back to top button