पुणे : लेखक सत्याला सामोरे जात नाहीत; नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची खंत | पुढारी

पुणे : लेखक सत्याला सामोरे जात नाहीत; नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची खंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजातील अनेक घटनांचे योग्य चित्रण मराठी साहित्यात झाले नाही. आणीबाणीच्या काळाचा वेध घेणार्‍या अतिशय कमी कादंबर्‍या मराठीत आहेत. दोन अपवाद वगळता दुष्काळाचे भीषण वास्तव मांडणारी कादंबरी मराठीत नाही. मराठी साहित्य व्यवहारावर कायम अदृश्य शक्तीचे वर्चस्व राहिले आहे. या शक्तीचे न ऐकल्यास संबंधित लेखकाला वाळीत टाकण्याची भीती असते. याचे कारण मराठी लेखक सत्याला निधडेपणाने सामोरे जात नाहीत, अशी खंत 97 व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी गुरुवारी व्यक्त केली.

मसापतर्फे डॉ. शोभणे यांचा अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, डॉ. शोभणे यांच्या पत्नी अरुणा शोभणे आदी उपस्थित होते. डॉ. शोभणे म्हणाले, पंथातीत होण्याचा, धर्मातीत होण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी एक अदृश्य शक्ती किंवा सत्ता तुम्हाला पुन्हा तिकडेच ओढत नेते. अन्यथा त्याचे परिणाम विविध पद्धतीने तुम्हाला भोगावे लागतात. त्यातूनच मग ‘रवींद्र शोभणे हा साहित्यिक आहे काय’ किंवा ‘आता सुमारांची सद्दी झाली आहे का’ , असे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारणारे सुमारच आहेत, हे विशेष. टीका करायची असेल तर नक्कीच करा. मात्र माध्यमांनी लेखकाचे तटस्थपणे मूल्यमापन केले पाहिजे.

निवडणुका वाईट नाहीत, त्या चांगल्याच आहेत. परंतु, भांडवलशाहीचा विकास होत गेला तसतशी निवडणूक ही पैशाची दासी होत गेली. ज्यांची ईडीची धाड पडावी, अशी पात्रता आहे तेच निवडणूक लढवू शकतात. त्यामुळेच महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्य संमेलनाची निवडणूक ईडीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही केला. अशा संस्थेचा अध्यक्ष असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.

डॉ. रावसाहेब कसबे, अध्यक्ष, मसाप

सन्मानाने अध्यक्षपद बहाल करण्याचा निर्णय घेतल्यापासून निवडणूक घेण्याबाबत साहित्य महामंडळावर दबाव येत आहे. साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदासाठी वर्षभर लॉबिंग करत आहेत. निवडीबाबत साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांवर टीका केली जात आहे. साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपद हे अंतिम ध्येय मानू नये. त्यांनीही पद आणि प्रतिष्ठा ठेवली पाहिजे.

प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप

हेही वाचा

सिंधुदुर्ग : कणकवली-कनेडी मार्गावर एस.टी.-दुचाकी अपघातात दोघे ठार

पुणे : कार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळे कर्मचारी त्रस्त; कार्यकर्ते- कर्मचारी वाद अधिकार्‍यांपर्यंत पोहचला

सोलापूर विमानसेवेचा लवकरच श्रीगणेशा

Back to top button