पुणे : कार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळे कर्मचारी त्रस्त; कार्यकर्ते- कर्मचारी वाद अधिकार्‍यांपर्यंत पोहचला | पुढारी

पुणे : कार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळे कर्मचारी त्रस्त; कार्यकर्ते- कर्मचारी वाद अधिकार्‍यांपर्यंत पोहचला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरी गरीब योजनेच्या कार्डधारकांंसाठी महापालिका भवनामध्ये सुरू केलेल्या केंद्रातील कर्मचारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळे आणि वारंवार होणार्‍या वादामुळे त्रस्त झाले आहेत. कार्यकर्ते आणि कर्मचार्‍यांमधील वाद गुरुवारी थेट वैद्यकीय सहायक अधिकार्‍याच्या दालनात पोहचला. शेवटी कार्यकर्त्यांसाठी नेता धावून आल्यानंतर या वादावर पडदा पडला.

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या कुटुंबासाठी महापालिकेकडून शहरी गरीब योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ धनिक लोकांकडून घेण्याचे प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने या योजनेच्या कार्डची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली आहे. ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येत नाही, अशा नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचाराच्या खर्चाचे प्रस्तावही स्वीकारले जातात.

या ठिकाणी सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दररोज खर्चाचे प्रस्ताव व नवीन कार्डचे अर्ज घेऊन येतात. नागरिकांची रांग असताना कार्यकर्ते मात्र थेट कार्यालयात घुसखोरी करून आपले काम अगोदर करण्यासाठी कर्मचार्‍यांना अरेरावी करतात. नेत्यांना फोन लावून देत कर्मचार्‍यांवर दबाव आणतात. यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. एका माजी नगरसेविकेच्या कार्यकर्त्याने गुरुवारी अशाचप्रकारे कर्मचार्‍यांसोबत वाद घातला. हा वाद वैद्यकीय सहायक अधिकार्‍याच्या दालनात पोहचला. अधिकार्‍यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर नेत्याने मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.

प्रभागातील हेव्यादाव्यांचा कर्मचार्‍यांना ताप

एकाच प्रभागातील विविध इच्छुकांकडून मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची कार्ड काढून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे इच्छुकांचे कार्यकर्ते एकापेक्षा अधिक अर्ज घेऊन या केंद्रावर येतात. हे कार्यकर्ते रांगेत न उभे राहता थेट कार्यालयात जाऊन कर्मचार्‍यांच्या समोर उभे राहतात. अशा वेळी त्याच प्रभागातील दुसर्‍या इच्छुकांचे कार्यकर्ते आत गेलेल्या कार्यकर्त्याकडे बोट दाखवत स्वतःही आत येतात. अशावेळी त्यांच्या हेव्यादाव्याचा त्रास कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो.

हेही वाचा

पडसाद भूकंपाचे : खा. सुळेंचा बारामती मतदारसंघच अडचणीत

शिंदे गटातील नाराजी संपेना

पाऊसमान बदलले, आपण कधी?

Back to top button