शिंदे गटातील नाराजी संपेना | पुढारी

शिंदे गटातील नाराजी संपेना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधील समावेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी संपायला तयार नाही. ‘मविआ’ सरकारमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला अडचणी निर्माण केल्या. आता ते पुन्हा सरकारमध्ये आल्याने आमच्यापुढे अडचणी उभ्या राहू शकतात, अशी खदखद माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. त्याचवेळी दोघांत तिसरा भिडू आल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.

दोन जुलैला झालेल्या शपथविधीचा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे शिंदे गटालाही बसला. बंड करताना ज्या अजित पवारांचे कारण पुढे केले तेच पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांत नाराजी आहे. आता आपला मंत्रिपदाचा नंबर हुकणार, याचीही चिंता त्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर, बच्चू कडू यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

हे प्रकार पुन्हा होऊ शकतात

आम्ही जेव्हा महाविकास आघाडीत एकत्र सत्तेत होतो, तेव्हा आम्हाला अजित पवारांनी निधी देताना अडवणूक केली होती. आता ते पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहेत. हे प्रकार पुन्हा होऊ शकतात. भाजपला निवडणुका जिंकून स्वतःची बाजू भक्कम करायची आहे. त्यासाठी मित्रपक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल, अशी त्यांची भूमिका असल्याची खदखद कडू यांनी व्यक्त केली.

शिंदे गटातील मंत्र्यांत बाचाबाची

शिंदे गटातील विद्यमान मंत्र्यांनी मंत्रिपदे सोडून दुसर्‍यांना संधी द्यावी, असा आग्रह भरत गोगावले, संजय शिरसाट यांनी धरला. त्यामुळे वातावरण तापून त्यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बाचाबाची झाल्याचे समजते. अखेर या सर्वांची समजूत मुख्यमंत्र्यांना काढणे भाग पडले. मी मंत्री होऊन रायगडचा पालकमंत्री होणार, असे छातीठोकपणे सांगणार्‍या भरत गोगावले यांना आदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी आदिती यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास जाहीर विरोध केला आहे.

Back to top button