पाऊसमान बदलले, आपण कधी? | पुढारी

पाऊसमान बदलले, आपण कधी?

डॉ. दत्ता देशकर, जलतज्ज्ञ

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैतही समाधानकारक मान्सून न बरसल्याने सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे पेरण्या रखडल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आपल्या मेहनतीला निसर्ग साथ देत नाही, हे निसर्गाने अनेक वर्षांपासून दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर निसर्ग बदलणार नसेल, तर किमान आपण तरी बदलले पाहिजे.

बदलत्या पर्यावरणामुळे पावसातील चढउतार तीव्र होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर हळूहळू आपल्याला शेतीच्या इतर पीक पद्धतींकडे वळावे लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे सिंचनाची काहीही सोय उपलब्ध नाही, जो निव्वळ पावसावर अवलंबून आहे अशा शेतकर्‍याने वनशेतीचा विचार करणे लाभदायक ठरेल. सध्या मान्सूनच्या पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकर्‍यांसह सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. खरे म्हणजे, गेल्या 100 वर्षांचा इतिहास असे सांगतो की, एकही वर्ष मान्सून आलाच नाही, असे झालेले नाही, तरीही आपण पावसाच्या नावाने ओरड करतो. याचे कारण पडणारा पाऊस साठवण्यात आपण कमी पडतो. साधारणपणे, सरासरी 350 मिलिमीटर पाऊस जरी पडला, तरी आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो, हे आपल्याला हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. तिथे केवळ 350 मिलिमीटर पाऊस पडूनही तेथील शेतकरी समाधानाने जगत आहेत. याचा अर्थ असा की, मान्सून ही आपली समस्या नसून पाणी जमा करणे ही आपली समस्या आहे. पुढील दोन वर्षे पुरेल इतका पाऊस दरवर्षी पडतो; पण आपण त्याचे संकलनच करत नाही. पूर्ण भारतामध्ये केवळ 10 टक्के पाण्याचे संकलन होते. उर्वरित 90 टक्के पाण्यापैकी अर्धे पाणी हे बाष्पीभवनाने नाहीसे होते, तर अर्धे पाणी हे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे शेतकरी शेवटी कोरडा तो कोरडाच राहतो.

अलीकडील काळात पाऊस बदलतो आहे, हे तर आता सर्वश्रुतच आहे. पावसाचे दिवस कमी होत आहेत, पावसाचा वेग वाढत आहे, वेगाने वाहणारे पाणी जमिनीत मुरत नाही, खरीप आणि रब्बी हंगामाची शाश्वती राहिली नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. आत्महत्या वाढत चालल्या आहेत. याही वर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आपल्या मेहनतीला निसर्ग साथ देत नाही हे निसर्गाने अनेक वर्षांपासून दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर निसर्ग बदलणार नसेल, तर किमान आपण तरी बदलले पाहिजे. त्यामुळे आपण बदलणार की नाही, याचा विचार करायची वेळ आली आहे. आपल्या पीक पद्धतीत काही चुकत तर नाही ना, याचा आपण कधी विचार केला आहे का? धान्य शेती ही अत्यंत बेभरवशाची शेती झाली आहे. धान्य शेती करून कोणी श्रीमंत झालेले आढळते का? पीक चांगले आले, तरी अडचण आणि फसले तरी अडचण. पीक चांगले आले, तर भाव पडणार आणि ते आले नाही, तर केलेला खर्च वाया जाणार. नैसर्गिक आपत्तींचे संकट जोडीला आहेच! थोडक्यात काय, तर दोन्ही बाजूंनी आपण अडचणीतच.

एकदम जरी नाही तरी हळूहळू आपल्याला शेतीच्या इतर पीक पद्धतींकडे वळावे लागणार आहे. आज एकाच शेतमालाचे भाव चढत आहेत, ते म्हणजे इमारती आणि जळाऊ लाकूड आणि त्यापासून मिळणारी इतर उत्पादने. गेल्या 50-60 वर्षांत या उत्पादनाचे भाव कधीच पडले नाहीत. म्हणूनच ज्याला शक्य आहे, ज्याच्याजवळ सिंचनाची काहीही सोय उपलब्ध नाही, जो निव्वळ पावसावर अवलंबून आहे अशा शेतकर्‍याने तरी वनशेती करावीच करावी. ही शेती करताना अशा वृक्षांची निवड करावी की, ज्यांना पाणी कमी लागते. एवढेच नाही, तर लावलेले वृक्ष आपल्याला फळांच्या स्वरूपात काही तरी देतील हेही पाहावे. चिंच, आवळा, बोरे, कवठे, डिंक, बकरी, मेंढ्यांसाठी चारा, औषधी वनस्पती, सीताफळे, बांबू यांना बाजारात चांगला भाव आहे. आज या सर्व पिकांचे सुधारित वाण बाजारात आली आहेत. लागवड केल्यापासून कमीतकमी दिवसांत हे वाण तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकतात.

वृक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पावसाचा ताण सहजपणे सहन करू शकतात. त्यांना पाहिजे तेवढे पाणी निसर्गापासून मिळवू शकतात. आपल्याला लावलेली झाडे तोडायची नाहीत, तर त्यांची छाटणी करून जे लाकूड निघते ते आपण विकून आपले पोट भरू शकतो. अमूक एका दिवशी ते शेतातून काढलेच पाहिजे असेही नाही. आपल्या सोयीने, बाजारभाव तपासून हे काम केले जाऊ शकते. लाकूड तोडून जरी ठेवले, तरी ते खराब होत नाही.

खते, औषधे यावर करावे लागणारे महाग खर्च यासाठी करावे लागत नाहीत. आज शेती आपण आपल्यासाठी नव्हे तर ती खत कंपन्या, औषधी कंपन्या यांच्यासाठी करतो की काय, असा प्रश्न पडायला लागला आहे. ते श्रीमंत होत आहेत. आपण मात्र आहोत तेथेच आहोत.
दुसरा भाग येतो प्रथिन शेतीचा. यात बकरी, शेळी पालन, कुक्कुटपालन यांचा समावेश होतो. आज शाकाहाराऐवजी मांसाहाराकडे समाज वळला आहे. हाही बाजार सतत तेजीत असतो. बाजाराला काय पाहिजे, हे पाहून शेती कसण्यातच शहाणपणा आहे. थोडक्यात सांगायचे तर शेती कसणे म्हणजे धान्य शेती करणे ही कल्पना आता मोडीत काढली पाहिजे. शिवाय दुग्धजन्य पदार्थांचीही सध्या बाजारात चलती आहे. आपल्याला जगणे महत्त्वाचे आहे आणि जी गोष्ट आपल्याला जगण्यासाठी साहाय्यभूत ठरेल तिकडे वळणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

आज देशात जंगलाखालील जमीन खूपच कमी झाली आहे. महाराष्ट्रात तर जंगलाखालील जमीन फक्त 8 टक्के उरली आहे. त्यामुळे पर्यावरणीय परिणाम जाणवत आहेत. उष्णतामान वाढत चालले आहे. पर्जन्यमान अस्थिर बनत आहे. वृक्षराजी वाढली, तर तापमानावर नियंत्रण येईल व पावसाळा स्थिर झाला, तर त्याचा दूरगामी अनुकूल परिणाम शेती व्यवसायावर झाल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक वनीकरणाखाली रस्त्यावर किंवा गायरानावर लावलेल्या झाडाचा धनी कोणीही राहत नाही; पण शेतावर झाड लावले, तर त्याला हात लावायला कोणीही धजावणार नाही. कारण, त्या झाडाला कोणीतरी मालक राहील. शेतकर्‍याला जगवण्यासाठी कायम मदत देत राहणे योग्य नव्हे. त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.

Back to top button