पडसाद भूकंपाचे : खा. सुळेंचा बारामती मतदारसंघच अडचणीत | पुढारी

पडसाद भूकंपाचे : खा. सुळेंचा बारामती मतदारसंघच अडचणीत

सुहास जगताप

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दणक्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पक्ष वाचविण्यासाठी धडपडत असताना त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ मात्र अडचणीत आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक नियोजन गेल्या निवडणुकीपर्यंत पूर्णपणे अजित पवारांच्या हातात होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत गावोगावी अजित पवार यांनाच मानणारे कार्यकर्ते आहेत.

खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील निवडणुकांची उमेदवारी देणे, त्यांच्या नियुक्त्या करणे, स्थानिक संस्थातील पदाधिकारी निवडणे या कशातच लक्ष न घालता सर्व अधिकार हे अजित पवार यांनाच दिले होते. त्यामुळे या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये तुरळक अपवाद वगळता सर्वत्र अजित पवार यांनी पदे दिल्याने, कामे केल्याने त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर गावोगावी आहेत. जवळजवळ सर्व पक्ष संघटना ही अजित पवार यांच्या हातात गेलेली आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा वेळ असताना सुप्रिया सुळे या आपला मतदारसंघ पुन्हा कशा बांधणार हा एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे आमदार स्वतः अजित पवार असून, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांकडे गेलेले आहेत. दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे आमदार आहेत. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे शरद पवार यांच्याशी फारसे सख्य नाही तर पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांची विधानसभेची निवडणूक गेल्या वेळी अजित पवार यांनी प्रतिष्ठेची करून त्यांना विजयी केले आहे. त्यामुळे तेसुद्धा काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज बारामती विधानसभा मतदारसंघातच कार्यकर्ते थेटपणे निवडणुकीच्या वेळेला अजित पवार सांगतील त्याप्रमाणे आपण काम करू, अजित पवार आमचे नेते आहेत आणि ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा पद्धतीने बारामतीतील कार्यकर्ते जाहीरपणे बोलू लागलेले आहेत. या सर्वांचा विचार केल्यास बारामती लोकसभा मतदारसंघातच विजय मिळवणे सुप्रिया सुळे यांना जड जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शरद पवार यांना बारामतीमध्येच अडकवून ठेवण्याची रणनीती यापूर्वी भाजपा अवलंबत होते. आता त्यामध्ये अजित पवारांची भर पडली आहे. त्यांनाही शरद पवार महाराष्ट्रात कमीत कमी फिरतील हे हवेच आहे. भाजप आणि अजित पवार हे दोघे मिळून शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून कसे बाहेर पडणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतील. त्यामुळे खा. सुळे यांच्या पुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्या वेळी अजित पवार हे सुळे यांच्याबरोबर असूनही शरद पवार यांना स्वतः मतदारसंघांमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागले होते. शरद पवार यांनी त्या वेळेला बैठकांपासून सभांपर्यंत सर्व बाबी या मतदारसंघात केल्या, त्यासाठी वेळ दिला. या वेळी तर अजित पवारही सुळे यांच्याबरोबर नसतील, भाजपा अधिक आक्रमक असेल अशावेळी काय स्थिती राहील आगामी राजकीय गणिते कशी ठरतील, यावर सुळे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

हेही वाचा

शिंदे गटातील नाराजी संपेना

पुणे-लखनौ विमानाला तब्बल 14 तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुणे : धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव; पर्यटनस्थळांवर एमटीडीसीकडून निर्बंध

Back to top button