पुणे : धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव; पर्यटनस्थळांवर एमटीडीसीकडून निर्बंध

पुणे : धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव; पर्यटनस्थळांवर एमटीडीसीकडून निर्बंध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पाऊस सक्रिय झाल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी पुणे विभागातील निसर्गरम्य ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून सुरक्षिततेबाबत विविध पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणी मज्जाव करण्यात येत आहे. समांतर पातळीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत.

पुणे जिल्ह्याच्या परिसरात धरणांचे जाळे आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या आणि 25 धरणे आहेत. याबरोबरच जिल्हा निसर्गरम्य ठिकाणांनी बहरला आहे. पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत असणार्‍या माळशेज, लोणावळा, भाजे, कार्ले, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना धरण आदी निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.

यंदा पाऊस विलंबाने सक्रिय झाला. मात्र, घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी धबधबे, पाणथळ ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात होत आहे. पावसामुळे रस्ते, घाट, पायवाटा निसरड्या झालेल्या असतात. दरडी कोसळण्याची शक्यता असते. अतिवृष्टी होण्याची शक्यता असते, असे असताना हौसी आणि हुल्लडबाज पर्यटकांकाडून गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार घडले असून, यंत्रणेवर त्याचादेखील ताण येत आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटन महामंडळाने माळशेज, कोयना धरण, सिंहगड, पानशेत आदी निवासस्थानांच्या ठिकाणी वन विभागाच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणे निश्चित करून या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी कठडे उभारले आहेत, सेल्फी पॉईंट किंवा छायाचित्र काढण्यासाठी गर्दी असणार्‍या धोकादायक ठिकाणीदेखील पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

माळशेज घाट, कोयनानगर, महाबळेश्वर आणि कार्ला येथील पर्यटकांसाठी खबरदारी म्हणून धोकादायक ठिकाणी सतर्क राहण्याबाबतच्या आशयाचे फलक लावले आहेत. तसेच सेल्फी पॉईंट काढून टाकण्यात आले आहेत, लोखंडी जाळ्या-कठडे बसविण्यात आले आहेत. पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा.

– मौसमी कोसे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे विभाग.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news