पुतण्याकडून काकांचे वस्त्रहरण | पुढारी

पुतण्याकडून काकांचे वस्त्रहरण

‘पेराल तेच उगवते’ अशी म्हण आहे. याचा सरळ आणि साधा अर्थ असा निघतो की, तुमच्या शेतात तुम्ही जे पेराल तेच तुमच्या शेतात उगवते. परंतु, राजकारणातला त्याचा अर्थ वेगळा निघतो आणि तो असा की, तुम्ही दुसर्‍याच्या शेतात जे पेराल ते तुमच्या शेतात उगवते. शरद पवार यांच्याबाबतीत अगदी तसेच घडताना दिसत आहे. त्यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीमध्ये जे राजकारण केले, त्याच राजकारणाची फळे त्यांना उत्तरायुष्यात चाखायला मिळत आहेत आणि स्वाभाविकपणे ती फळे कटू आहेत. त्यांच्यावर आलेली ही वेळ म्हणजे त्यांच्याच कर्तृत्वाची फळे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा घेऊन बाहेर पडलेले त्यांचे पुतणे अजित पवार यांनी मुंबईत आपल्या गटाचे शक्तिप्रदर्शन करताना त्यांचे जाहीर वस्त्रहरण केले असून त्यांचा सगळा भूतकाळच त्यांच्या पुढ्यात टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांची आणखी एक आरपारची लढाई सुरू झाली आहे. काका-पुतण्याच्या संघर्षाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचा अपवाद वगळता राजकारणातील बहुतेक काकांना पुतण्याने आव्हान दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरे यांनी आव्हान दिले. गोपीनाथ मुंडे यांना सोडून धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. सुनील तटकरे-अवधूत तटकरे, अनिल देशमुख-आशिष देशमुख, जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर अशी आणखीही काही नावे घेता येतील. ठाकरे किंवा मुंडे कुटुंबात हा कलह निर्माण झाला तेव्हा आमच्याकडे असा संघर्ष कधीच होणार नाही, असा दावा पवार कुटुंबाकडून करण्यात येत होता. अजित पवार यांच्या सहनशीलतेमुळे दोघांमधील सौहार्द तुलनेने अधिक काळ चालले हे खरे; परंतु इथेही इतिहासाची पुनरावृत्ती झालीच. शरद पवार यांनी राजकीय वारसदार म्हणून कन्या सुप्रिया सुळे यांची निवड करून पुतण्या अजित पवार यांची उपेक्षा केली. त्याच उद्वेगातून अजित पवार यांनी ‘आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे काय’ असा प्रश्न जाहीरपणे विचारला.

काका-पुतण्याच्या राजकारणापलीकडची आणखी एक गोष्ट म्हणजे पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या राजकारणात कुटुंब कलहाला खतपाणी घातले. वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबात विष्णूअण्णा पाटील यांना वेगळे केले. अकलूजच्या मोहिते- पाटील घराण्यात विजयसिंह आणि प्रतापसिंह या भावांमध्ये भांडणे लावली. उदयनराजे भोसले आणि अभयसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातार्‍याच्या राजघराण्यातही संघर्षाला प्रोत्साहन दिले. असे राजकारण करणार्‍या शरद पवार यांना वयाच्या 83 व्या वर्षी तशाच प्रकारच्या राजकारणाचा सामना करावा लागत आहे, हा एका अर्थाने काव्यगत न्याय म्हणावा लागेल. पवार यांच्या द़ृष्टीने तो दुःखदायक असला, तरी ती आजच्या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्तुस्थिती आहे आणि ती कुणालाही नाकारता येणार नाही.

शरद पवार हे सातत्याने फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन विचारधारेचे राजकारण करीत असल्याचा देखावा उभा करतात; परंतु तो खरा नाही, हे अजित पवार यांनी जाहीर भाषणांतून अनेक उदाहरणांसह दाखवून दिले. त्यांनी आपल्या काकांना आरसा तर दाखवलाच आहे, शिवाय महाराष्ट्रातील जनतेलाही शरद पवार यांची खरी ओळख करून दिली आणि पुतण्याइतकी काकांची चांगली ओळख दुसरे कुणी करून देऊ शकत नाही. अजित पवार यांच्या भाषणातून प्रचंड राग आणि त्याबरोबर वेदनाही व्यक्त होत होती. काकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्याने आपला मोहरा म्हणून वापर केल्याचे दुःख त्यांच्या भाषणातून व्यक्त होत होते. पुरोगामित्वाचे ढोल वाजवणार्‍या शरद पवार यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून जनसंघासोबत सरकार स्थापन केले होते.

सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून ते काँग्रेसपासून वेगळे झाले आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्याच काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत बैठक घेऊन खातेवाटपापर्यंतची चर्चा केली. 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीतील उद्योगपतीच्या घरी पाच बैठका झाल्या, असे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट करून अजित पवार यांनी शरद पवार यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाडून टाकला. यातलाच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा. त्या शपथविधीला शरद पवार यांचा आशीर्वाद होता किंवा नाही, याबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत होते.

गेल्याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात त्यासंदर्भातील कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी आपण फक्त अर्धसत्य सांगितल्याचे फडणवीस म्हणाले होते आणि पूर्णसत्य लवकरच समोर येईल, म्हणाले होते. अर्थात, ते इतक्या लवकर आणि दस्तुरखुद्द अजित पवारांच्या तोंडून समोर येईल, याची मात्र कुणाला कल्पना नव्हती. त्या शपथविधीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळून आपण काकांची प्रतिष्ठा जपून वाईटपणा स्वतःकडे घेत होतो. परंतु, प्रत्येकवेळी आपल्याला खलनायक ठरवले गेल्याचा आरोप करताना त्यांनी अलीकडेच रंगलेल्या शरद पवार यांच्या राजीनामानाट्याचा दाखला दिला. अजित पवार हे केवळ आपल्या काकांचे वस्त्रहरण करून थांबलेले नाहीत, तर राजकीय चालीमध्येही आपण त्यांच्या दोन पावले पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. शरद पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर करून त्याजागी स्वतःची निवड करून त्यांनी तो ठराव शपथविधीच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाकडे पाठवला. कायदेशीर लढाईमध्येही आपण मागे राहणार नाही, हेच त्यांनी दाखवून दिले. काकांकडून शिकलेले डाव त्यांच्यावरच वापरण्याचा राजकारणातला हा प्रयोग दीर्घकाळ महाराष्ट्राच्या लक्षात राहील, यात शंका नाही.

Back to top button