पुणे : नाव गोपनीय ठेवण्याच्या नियमाला अतिक्रमण निरीक्षकाकडून मूठमाती | पुढारी

पुणे : नाव गोपनीय ठेवण्याच्या नियमाला अतिक्रमण निरीक्षकाकडून मूठमाती

पुणे : अनधिकृत फ्लेक्स काढण्यासाठी येणार्‍या महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा मोबाईल नंबर थेट फ्लेक्स लावणार्‍या कार्यकर्त्याला देण्याचा व कारवाई न करण्याबाबत बोलून घेण्याचा सल्ला देण्याचा प्रताप अतिक्रमण निरीक्षकानेच गुरुवारी केला. त्यामुळे तक्रार करणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्याच्या संकेतालाच मूठमाती देण्याचे काम अधिकारी आणि कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तांनी सिंहगड रस्ता परिसरात पाहणी केली. या वेळी त्यांना राजाराम पुलापासून ते धायरीपर्यंत अनेक चौकांत अनधिकृत पथारी, खराब रस्ते, रस्त्याच्या कडेला अनधिकृत फ्लेक्स, राडरोडा, खड्डे दिसून आले.

त्यानंतर, त्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांसह, परिमंडळ उपायुक्तांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लागलेल्या फ्लेक्सवर कारवाई करण्याच्या सूचनाही अतिक्रमण निरीक्षक तसेच आकाशचिन्ह निरीक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार, कारवाई करून फ्लेक्स काढणे अपेक्षित असताना उलट या कर्मचार्‍यांकडून संबंधित फ्लेक्स लावणार्‍या कार्यकर्त्यास अतिरिक्त आयुक्तांचे नाव सांगण्यात आले, तर एवढ्यावर न थांबता त्यांचा फोन क्रमांक देत ‘तुम्ही त्यांना सांगा तोपर्यंत आम्ही कारवाई करत नाही’ असे सुचविण्यात आले. त्यानुसार, या कार्यकर्त्याने अतिरिक्त आयुक्तांना फोन करत ‘तुम्ही माझी तक्रार करून फ्लेक्स काढायला सांगितला का’, अशी थेट विचारणा केली. तसेच, तुमच्या कर्मचार्‍यांनीच मोबाईल क्रमांक दिल्याचेही सांगितले.

पालिका कर्मचारी-जाहिरातदार हितसंबंध

तक्रारादाराचे नाव गोपनीय ठेवणे आवश्यक असताना, तसेच थेट अतिरिक्त आयुक्तांचीच तक्रार असताना कर्मचार्‍यांनी त्यांना क्रमांक दिल्याने या अधिकार्‍यासही धक्का बसला आहे. यामुळे जाहिरात करणारे आणि महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यातील हितसंबध पुन्हा समोर आले.

हेही वाचा

पुतण्याकडून काकांचे वस्त्रहरण

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील सुविधांसाठी समिती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी दिपक मानकर

Back to top button