टोमॅटोच्या क्रेटला 2500 रुपयांचा भाव; शेतकरीवर्गात समाधानाची भावना | पुढारी

टोमॅटोच्या क्रेटला 2500 रुपयांचा भाव; शेतकरीवर्गात समाधानाची भावना

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नारायणगाव येथे उच्च प्रतीच्या टोमॅटोच्या 20 किलोच्या एका क्रेटला दोन ते अडीच हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. उच्च बाजारभावाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाची भावना असून, शेतकर्‍यांनी बाजार समितीत टोमॅटो विक्रीस आणताना प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे यांनी केले आहे. जून महिन्यात 8 लाख 68 हजार 55 कॅरेटची उपबाजार नारायणगाव येथे आवक होऊन 1 ते 15 जूनदरम्यान टोमॅटोच्या 20 किलोच्या एका क्रेटचा भाव पाचशे रुपयांपर्यंत होता. नंतर 16 ते 30 जूनदरम्यान हा भाव चौदाशे रुपयांपर्यंत गेला होता.

1 ते 3 जुलैपर्यंत एका क्रेटचा भाव सातशेपासून दोन हजार रुपयांपर्यंत गेला. 4 व 5 जुलै या दिवशी उच्च प्रतीच्या टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला उच्चांकी 2100 ते 2500 चा भाव णिळाला. जून महिन्याच्या शेवटी बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीतून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सचिव रूपेश कवडे व उपसचिव शरद धोंगडे यांनी सांगितले.

संपूर्ण मे, तर जून महिन्याच्या सुरुवातीस उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीत टोमॅटोची आवक झाली होती. तुलनेने मागणी कमी झाल्याने अतिशय कमी भावात टोमॅटो विकणे भाग पडले. काही शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून दिले होते. नंतर टोमॅटोची मागणी वाढून आवक कमी झाल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेतकर्‍यांनी सरसट्टा माल क्रेटमध्ये भरून न आणता प्रतवारी करून आणल्यास चांगले बाजारभाव मिळतील, अशी सूचना बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे व सारंग घोलप यांनी केली आहे.

बाजार समितीत येणारे टोमॅटो हे राजकोट, भुज, इंदूर येथे जात आहेत. सद्य:स्थितीत टोमॅटोला चांगले बाजार आहेत. हे दर महिनाभर तरी स्थिर राहतील. शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकावर योग्य फवारण्या व खते देऊन उच्च प्रतीचे उत्पादन बाजारात पाठविल्यास त्यांना चांगला दर मिळेल.

– जालिंदर डुकरे, माऊली टोमॅटो सप्लायर, नारायणगाव

हेही वाचा

Sidhi Viral Video : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी पीडित तरुणाचे धुतले पाय!, जाणून घ्या कारण

नगर : पावसामुळे कांद्याचे लिलाव ठप्प ; दीडशे ते दोनशे वाहने कांदा घेऊन बाजार समितीत उभी

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरातील विद्यार्थ्यांचा जीव ‘राम भरोसे’

Back to top button