Sidhi Viral Video : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी पीडित तरुणाचे धुतले पाय!, जाणून घ्या कारण | पुढारी

Sidhi Viral Video : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी पीडित तरुणाचे धुतले पाय!, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील ‘लघुशंका’ प्रकरणातील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या निवासस्थानी बोलावले. त्यांनी पीडित व्यक्तीची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी तरुणाकडून त्याच्या कामाची आणि व्यवसायाची माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. हा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने आणि  शिवराज सिंह चौहान यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. (Sidhi Viral Video )

Sidhi Viral Video : आराेपीच्‍या घरावर बुलडोझर 

सिधी येथील एका आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या कृत्‍याने देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रवेश शुक्ला याला मंगळवारी (दि.४) रात्री अटक करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) ही कारवाई करण्यात आली. शुक्ला याच्या बेकायदा घरावर बुधवारी (दि.५)बुलडोझरने जमीनदाेस्‍त करण्‍यात आले.त्‍याला अटकही करण्‍यात आली आहे. संप्रवेश शुक्ला हा आमदार केदार शुक्ला यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. केदार शुक्ला यांनी प्रवेश शुक्ला याच्‍याशी काेणताही संपर्क नसल्‍याचा दावा केला आहे.

Sidhi Viral Video : मुख्‍यमंत्री चाैहान यांनी व्यक्त केली दिलगिरी 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील लघुशंका घटनेतील पीडित व्यक्तीला आज (दि.६) आपल्या निवासस्थानी बोलवले आणि त्याचा सन्मान करत दिलगिरी व्यक्त केली आहे. या सन्मानावेळी त्यांनी पीडित व्यक्तीचे  पाय धुतले, तिलक लावला, शाल पांघरून त्यांचा सत्कार केला.  त्याचबरोबर मुख्यमंत्री शिवराज यांनी पीडित तरुणाला गणेशाची मूर्तीही अर्पण केली . श्रीफळ व कपडेही देण्यात आली.

शिवराज सिंह चौहान यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, “मी हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून सर्वांना समजावे की शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशमध्‍ये आहेत. त्यांच्यासाठी जनताच देव आहे. कोणावरही अत्याचार सहन केले जाणार नाहीत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा आदर हाच माझा आदर आहे.”

भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत : कॉंग्रेस

भाजपने आदिवासी समाजाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शिवराज सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते की, भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांवर अत्याचार वाढत आहेत. मध्य प्रदेशातील एका भाजप नेत्याच्या अमानुष गुन्ह्याने संपूर्ण मानवतेला लाजवेल असा प्रकार घडला.

हेही वाचा 

Back to top button