पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरातील विद्यार्थ्यांचा जीव ‘राम भरोसे’ | पुढारी

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरातील विद्यार्थ्यांचा जीव ‘राम भरोसे’

खेड शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर (ता. हवेली) येथे उड्डाणपूल नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत आहे. अनेकवेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पत्रव्यवहार करूनही उड्डाणपुलाचे काम होत नसल्याचे विद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव ‘राम भरोसे’ असल्याचेच म्हणावे लागेल.

पुणे-सातारा महामार्गाच्या शेजारी शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयात शिवगंगा खोर्‍यातून विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात येतो. विद्यालय सुटल्यानंतर बोरमाळ, खोपी, शिवरे, वरवे, नसरापूर या भागांतील विद्यार्थ्यांनाही रोजच पुणे-सातारा महामार्ग जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो. मात्र या ठिकाणी भविष्यात मोठा धोका संभवतो आहे. हे संबंधित प्रशासनास कधी समजेल, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

सन 2010पासून महामार्गावरील उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या दरम्यान खेड-शिवापूर, हरीचंद्री व किकवी येथील उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरू केले नाही. त्यामुळे अनेकवेळा याठिकाणी अपघात झाले आहेत. खेड-शिवापूर येथील उड्डाणपूल निदान विद्यार्थ्यांसाठी तरी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात आजपर्यंत अनेकवेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना संपर्क साधला. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी कॉल न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही.

आम्ही अनेकवेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी संजय कदम यांच्याशी बोललो असून, उड्डाणपूल करण्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी गावातील अनेकांचा याठिकाणी अपघात झाला आहे. ही गोष्ट अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल.

– अमोल कोंडे, माजी सरपंच, खेड-शिवापूर.

हेही वाचा

कुरकुंभ एमआयडीसीतील पार्किंगच्या अधिकृत भूखंडांची केली विक्री

कौतुकास्पद !! वडापाव विक्रेत्याची मुलगी झाली पीएसआय

नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली

Back to top button