वळसे-पाटलांच्या मंत्रिपदामुळे खेड, जुन्नरचे आमदार संभ्रमात! | पुढारी

वळसे-पाटलांच्या मंत्रिपदामुळे खेड, जुन्नरचे आमदार संभ्रमात!

सुषमा नेहरकर-शिंदे 
पुणे : राज्यात रविवारी झालेल्या राजकीय महाभूकंपानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचही आमदार मुंबईत बंडखोर नेते अजित पवार यांच्या सोबत उपस्थित होते. परंतु पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांच्या बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका, जनमत आपल्या विरोधात जाईल यांची धास्ती आणि ज्याच्या त्रासामुळे, ज्या आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यामुळे आतापर्यंत उपेक्षित राहण्याची वेळ आली त्यांनीच अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दिलीप मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वळसे-पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत थेट नाराजी व्यक्त करत एक-दोन दिवसांत शरद पवार यांना भेटायला जाण्याची तयारी सुरू केली. तर अतुल बेनके यांनीदेखील सावध पवित्रा घेत परिस्थितीचा अंदाज घेत तीन-चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे दै.‘पुढारी’ला सांगितले.  दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित आमदारांनी दुसर्‍याच दिवशी शरद पवार यांच्या सोबत जायचे की अजित पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात 2 जुलैच्या रविवारी प्रचंड मोठे महानाट्य होत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुतेक सर्व मोठ्या नेत्यांनी बंड करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामध्ये आपल्या राजकीय करिअरच्या आधीपासून शरद पवार यांच्या सोबत राहिलेले, पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे-पाटील यांनीदेखील अजित पवार यांच्या सोबत बंडात सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली.
अजित पवार यांनी वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेतली त्या प्रत्येक वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, जुन्नर आणि शिरूरचे आमदार अजित पवार यांच्यामागे भक्कम उभे राहिले. प्रत्येक वेळी या तीनही आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिले. यामध्ये सर्वांत मोठे कारण म्हणजे गेले 25-30 वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रत्येक वेळी आंबेगाव तालुक्यातील आमदार दिलीप वळसे-पाटील यांना झुकते माप देत जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील नेतृत्वांवर अन्याय केला.
या एका भूमिकेतून हे तिन्ही आमदार शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या अधिक जवळ गेले, राहिले. यामुळेच रविवारी शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाचही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यासोबत मुंबईत हजर होते; परंतु सोमवारी (दि. 3)  खेड आणि जुन्नर तालुक्यातील आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मंत्रिपदामुळे नाराज असल्याचे व  शरद पवार यांच्या सोबत राहायचे की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा  याबाबत संभ्रमात असल्याचे दै.‘पुढारी’ सोबत बोलताना सांगितले.
हेही वाचा

Back to top button